अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी तीन विद्यार्थ्यांची दोन लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमचंद इंद्रचंद्र मोहनानी (रा. घारपुरे लेआऊट, सिंदी मेघे जि. वर्धा) यांची आरोपी शंकर थोरात (रा. सिंदी मेघे) याने कल्पना सतीश खल्लासे (रा. गांधीनगर नागपूर) यांच्याशी फोनवर ओळख करून दिली. ‘मी तुमचा मुलगा सुमितला वायसीसी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देते, आणखी कुणी असतील तर त्यांचाही प्रवेश करून देते’ असे आश्वासन तिने फोनवर बोलताना दिले. ‘त्यासाठी डोनेशन फी लागेल’ असेही ती म्हणाली. प्रेमचंद मोहनानी तसेच सुमितचे मित्र चेतन जेहानी (रा. पोद्दार बगिचा) व मोहम्मद रज्जाक पाशा (रा. भूगाव) यांच्याकडून कल्पनाने ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर दरम्यान हिंगणामधील डीएमएलटी महाविद्यालयाच्या कार्यालयात ५ लाख ८६ हजार ८१५ रुपये हप्त्याने घेतले. आरोपी शंकर थोरात याने प्रेमचंद मोहनानीकडून ‘तुझ्या मुलाला माझ्यामुळे प्रवेश मिळत आहे’ असे म्हणत ४७ हजार रुपये घेतले. सतीश खल्लासे व सुश्रूत सतीश खल्लासे या दोघांनी त्यांना या कामात सहकार्य केले. आरोपींनी रक्कम घेऊनही या तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला नाही. घेतलेल्या रकमेपैकी ४ लाख २५ हजार रुपये परत दिले. शिल्लक २ लाख ८ हजार ८१५ रुपये परत दिले नाहीत. याची तक्रार प्रेमचंद मोहनानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी शंकर थोरात (रा. सिंदी मेघे), सतीश खल्लासे, कल्पना सतीश खल्लासे, सुश्रूत सतीश खल्लासे (रा. गांधीनगर नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी दोन लाखाने तिघांची फसवणूक, एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी तीन विद्यार्थ्यांची दोन लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 29-11-2012 at 03:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three got cheated for 2 lacks for college admission complaint against four people including one women