सांगली : सांगलीहून मिरजेकडे निघालेल्या मोटारीने दोन दुचाकींसह पाच वाहनांना ठोकरल्याने गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. जखमींना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी नेक्सन मोटार (एमएच १० ईई ९६६६) हे वाहन सांगलीहून मिरजेकडे निघाले होते. कृपामयी पुलानंतर पुढे गेल्यानंतर सेवासदन हॉस्पिटलकडून जोड रस्ता येईपर्यंतच्या शंभर मीटर अंतरामध्ये या वाहनाने भरधाव वेगाने येत दोन दुचाकी, एक रिक्षा, एक मोठा टेम्पो आणि एक छोटा टेम्पो अशा पाच वाहनांना अचानकपणे ठोकरले. एक दुचाकी तर मोटारीच्या खाली गेली. मोटारीने जोरदार ठोकरल्याने दुचाकीवरील बाजूला पडलेले तिघेजण जखमी झाले. वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विजेवर चालविण्यात येणाऱ्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटला असल्याचा अंदाज असून, चालकाने प्रथमदर्शनी मोटारीची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले आहे. मात्र, मोटारीची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच याबाबत खात्रीलायक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. वर्दळीच्या रस्त्यावर अपघात झाल्याने सांगलीकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी सुमारे एक तास झाली होती.