चाळीसगाव शहराजवळील खरजई गावाजवळ फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी झालेल्या स्फोटात महिला कामगारासह एका बालिकेचा मृत्यू झाला. कारखाना संपूर्णपणे खाक झाला असून चार कामगार जखमी झाले आहेत.
चाळीसगावहून खरजईकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीहरी ओम हा फटाक्यांचा कारखाना आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कारखान्यात जोरदार स्फोट झाला. कारखान्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आग भडकली. या स्फोटात मीराबाई शिवदास सोनवणे या कामगारासह आरती अरुण स्वर्णे (११ वर्षे) या बालिकेचा मृत्यू झाला. आरतीचे मामा कारखान्यात कामाला आहेत. ती शाळेतून मामाकडे घराची चावी घेण्यासाठी आली होती. नेमका त्याचवेळी कारखान्यात जोरदार स्फोट झाला. कारखान्यात लागलेली आग विझविण्यासाठी चाळीसगावसह पाचोरा व भडगाव येथूनही अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. अग्निशमन दलाने तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे जखमी झालेल्या चौघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader