मनमाड-नांदगाव रस्त्यावर इंडियन ऑइल कारखान्यासमोर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा असणारा टँकर न दिसल्याने दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर दोन जण जखमी झाले. अपघातग्रस्त मोटारसायकलींना धडकून इंडिका कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली.
महाशिवरात्रीनिमित्त नागापूर येथे जोंधळेवाडी येथील काळे परिवारातील काही सदस्य मोटारसायकलवर आले होते. दर्शन घेऊन परतत असताना रस्त्यालगतचा टँकर न दिसल्याने हा अपघात झाला. त्यात राणी काळे (१८, रा. जोंधळवाडी) आणि संदीप गवारे (१७, रा. भालूर) यांचा मृत्यू झाला. तर शितल काळे (२५), प्रतिभा काळे (१३) आणि समर्थ साईनाथ काळे हे जखमी झाले. मनमाडच्या जिल्हा उप रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे पाठविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना प्रतिभा काळे हिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या टँकरमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याची तक्रार केली.