देवदर्शन करून परतत असताना पुणे-सोलापूर रस्त्यावर जीप व वाळू वाहतूक करणा-या ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील दोन बहिणींसह तिघे जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
जवळे येथील गोपीनाथ महादू सालके, जयश्री सोमनाथ घावटे, कुसुम अशोक कामठे हे आपल्या नातेवाइकांसह खासगी जीपने तुळजापूर, पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन करून परतत असताना पुणे-सोलापूर रस्त्यावर पळसदेव गावाच्या हद्दीत जीपला (एमएच १२ एचएन ११८०) वाळू वाहतूक करणा-या मोटारीने (एमएच १२ बीटी ६७५) जोराची धकड दिली. धडक इतकी जोरदार होती की जीपचा चक्काचूर झाला.
अपघातात जयश्री सोमनाथ घावटे (वय २८, रा. सरदवाडी, शिरूर), जयश्री सोमनाथ कामठे (२६, रा. जवळे, पारनेर), या दोन सख्ख्या बहिणींसह जीपचा चालक राजेंद्र किसन सरोदे (४०, रा. सरदवाडी, शिरूर) हे जागीच ठार झाले. तर वंदना नानासाहेब चौधरी (४०), प्रमोद नानासाहेब चौधरी (२०, दोघेही रा. महाजन मळा, शिरूर), सोमनाथ चंद्रराव घावटे (४३ रा. सरदवाडी) मनीषा बाळासाहेब काळे (३०), बाळासाहेब पंढरीनाथ काळे (३५, दोघेही रा. जवळा) हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना शिरूरच्या माणिकचंद धारिवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यश सोमनाथ घावटे (१२), अमर सोमनाथ घावटे (१०), धीरज अशोक कामठे (८), अमर संतोष सालके (१०) ही मुले या अपघातात किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. चालकाविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व जखमी जवळा व शिरूर येथील रहिवासी तसेच एकमेकांचे नातेवाईक आहेत. अपघाताची माहिती जवळे येथे समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा