लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : येथील एक ज्येष्ठ गायक आणि निवृत्त शिक्षकाच्या निधनानंतर त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेनेच त्याच्या बँक खात्यावरील तीन लाखांची रक्कम हडपली. याप्रकरणी मृत गायकाच्या मुलाच्या फिर्यादीनुसार, संबंधित महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात तन्वीर यासीन सय्यद (वय ४३, रा. सुविधा टॉवर, पूजानगर, मीरा रोड, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे दिवंगत वडील यासीन सय्यद हे सोलापुरातील सोशल उर्दू प्रशालेत संगीत शिक्षक या पदावर कार्यरत होते. ते उत्कृष्ट गायक होते. प्रति मोहम्मद रफी अशी त्यांची ओळख होती. मोहम्मद रफी कुटुंबीयांसह प्रख्यात संगीतकार नौशाद अली यांच्याशी त्यांचे थेट संबंध होते. त्यांची मुले उच्च शिक्षणासाठी मुंबईत आईसह राहत होती. इकडे निवृत्तीनंतर यासीन सय्यद हे मुंबईतील हवामान मानवत नसल्यामुळे सोलापुरातच एकटे राहत होते. दरम्यान, संगीत कलेच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर यासीन सय्यद हे जुळे सोलापुरात एका सदनिकेत एका महिलेबरोबर एकत्र राहू लागले. वृद्धापकाळात आपल्या वडिलांची दैनंदिन काळजी घेतली जात असल्याने सय्यद कुटुंबीयांची त्यास हरकत नव्हती.

दरम्यान, यासीन सय्यद यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीनंतर सय्यद कुटुंबीयांना या मृत्यूबद्दल संशय आला. त्याच वेळी यासीन सय्यद यांच्या बँक खात्यावरील तीन लाखांची रक्कम संबंधित महिलेने काढून घेतल्याचे आढळून आले. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सय्यद कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, सय्यद यांचा मृतदेह पोलिसांनी तहसीलदारांसमक्ष उकरून बाहेर काढला आणि न्यायवैद्यक तपासणी करून घेतली. याबाबतचा तपास सुरू असताना संबंधित महिलेविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.