कराडजवळील वनवासमाची येथे ऊसतोड सुरु असताना, ऊसाच्या फडात तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले सोमवारी आढळून आली. तर, पिल्लांना जन्म देणारी मादी बिबट्याही इथेच घुटमळत असण्याच्या शक्यतेने परिसरात घबराहट पसरली.वनवासमाचीत प्रकाश तुकाराम यादव यांच्या शेतात तोड सुरु असताना ऊस तोडकऱ्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. यावर त्यांनी बारकाईने पहिले असता, शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी लगेचच ऊसतोड बंद करत याबाबत शेतकरी प्रकाश यादव यांना कळवले.
यादव यांनी तात्काळ वनाधिकारी व प्राणीमित्रांना याबाबतची माहिती दिली. यावर प्राणीमित्र सुरेश पवार, वनपाल सागर कुंभार व वनरक्षक दिपाली अवघडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मादी बिबट्याही याच परिसरात असण्याची शक्यता गृहीत धरून ही पिल्ले ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी ठेवून त्यावर रात्रभर लक्ष राखणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वनवासमाचीमध्ये बिबट्याची ही तीन पिल्ले आढळल्यामुळे लगतच्या वहागाव, खोडशी, घोणशी आणि तळबीड परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही बिबट्याने अनेकदा पशुधनांवर हल्ले करण्याच्या घटनाही घडल्या असल्याने लोकांमध्ये घबराहट परसली आहे.