धाराशिव : तुळजाभवानी मंदिरातील दागिन्यांची चोरी, अधिकार्यांचे गोपनीय अहवाल, दुर्मिळ नाण्यांची चोरी अशा एक ना दोन तब्बल ५५ संचिका गायब आहेत. मंदिरातील अनेक घोटाळे दडपून टाकण्यासाठीच या संचिकांना पाय फुटल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी चौकशी समितीनेच 55 संचिका गहाळ असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. आता पुन्हा नव्याने नियुक्त केलेल्या चौकशी समितीतून काय बाहेर येणार? याची उत्सुकता राज्यभरातील भाविकांना लागली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील कर्मचार्यांच्या पदभार हस्तांतर प्रक्रियेत अनेक संचिका गहाळ झाल्या असल्याचे समोर आले. आस्थापना विभागात 2021-22 या कालावधीत दोनवेळा पदभार हस्तांतरित करण्यात आला. सुरूवातीला नागेश यशवंत शितोळे यांनी जयसिंग जीवन पाटील यांच्याकडे आणि जयसिंग पाटील यांनी विश्वास कदम यांच्याकडे हा पदभार हस्तांतरीत केला. शितोळे यांच्याकडून पदभार घेत असताना चार्जपट्टीमध्ये नमुद असलेल्या 55 महत्वपूर्ण संंचिका जयसिंग पाटील यांनी कदम यांना पदभार देताना सुपूर्द केल्या नाहीत. चौकशी समितीने दोन वर्षांपूर्वी संचिका यादीसह हा सर्व प्रकार तुळजाभवानी मंदिर समितीच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र याकडे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कानाडोळा केला. तेंव्हापासून या सचिका नेमक्या कुठे आहेत, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा >>> सोलापूर: रिक्षा फिटनेसचा वाढीव दंड रद्द न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव
लोकसत्ताने संचिकांच्या यादीसह हे सर्व प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. त्यानंतर मंदिर समितीने या प्रकरणातील संशयितांंना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा मागविला. संगणक सहाय्यक असलेल्या जयसिंग पाटील यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्यामुळे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीने मंदिरातील आस्थापना विभाग, अभिलेखा कक्ष येथे समक्ष तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. तुळजाभवानी मंदिर समितीचे लेखाधिकारी या समितीचे प्रमुख असतील. तर लेखापाल तथा सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक आणि स्थापत्य विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 28 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून आता समिती काय अहवाल देणार? याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>> “माझं दुःख ऐकून घ्या, मी कटोरा घेऊन…”, जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत मांडली व्यथा
या संचिकांना फुटले आहेत पाय
अत्यंत महत्वाच्या असलेल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासणीसंबंधीची संचिका सध्या गहाळ आहे. त्याचबरोबर पदोन्नती, लेखाधिकारी प्रतिनियुक्ती पदभार, स्थायी संचिका, नवरात्र महोत्सव यात्रा व्यवस्थेबाबतची संचिका, दानपेटी मोजणी अधिकारी संचिका, मंदिरातील भरती प्रक्रियेबाबतची संचिका, अशा एक-दोन नव्हे, तब्बल 55 संचिका दोन वर्षांपासून गहाळ आहेत. यात अनेक विकासकामांच्या संचिकांचा देखील समावेश आहे.
यांचे गोपनीय अहवालही गहाळ
मंदिरात कार्यरत असलेल्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या गोपनीय अहवालाची संचिकाही मागील दोन वर्षांपासून गहाळ आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या पदभार हस्तांतरण प्रक्रियेत संचिका गहाळ झाली, त्यांचा गोपनीय अहवालही या संचिकेत समाविष्ठ होता. राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, मार्तंड दिक्षीत, सिध्देश्वर इंतुले, विश्वास कदम, विश्वास सातपुते, महेंद्र आदमाने, रामचंद्र यमगर आणि बिभीषण साळुंके यांचे गोपनीय अहवाल गहाळ झालेल्या संचिकेत आहेत.