जालना : चौथेही अपत्य मुलीच्या रुपाने जन्मले आणि त्यावरून जवळचे नातलग अपमानित करत असल्याचे पाहून जन्मदात्या माता-पित्यांनीच त्यांच्या तीन महिन्याच्या मुलीचा विहिरीत फेकून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. यासंदर्भातील माहिती चंदनझिरा पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी मिळाली. याप्रकरणी मृत मुलीचे जन्मदाते सतीश पंडित पवार व पूजा सतीश पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत १२ एप्रिल रोजी तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत

तपासाची सूत्रे हलविली होती. अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला की अन्य काही कारणामुळे..? अशा सर्व शक्यतांची पडताळणी करीत पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या माता-पित्यांची माहिती जमविण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले यांनी असरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढत असतांना, त्यांना या चिमुकलीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले. आसरखेडा गावापासून जवळच असलेल्या गारवाडी तांडा (ता. बदनापूर) सतीश पंडित पवार आणि त्याची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथे अपत्येही मुलगीच झाल्यामुळे त्यांनी तिला दुचाकीवरून नेऊन, विहिरीत टाकले. त्यानंतर सतीश पवार याने त्याची पत्नी पूजा हिस वखारी वडगांव (ता. जालना) येथे नेऊन सोडले होते.

चौथीही मुलगी झाल्यामुळे पवार दाम्पत्याला काही जवळचे नातेवाईकही अपमानित करीत असल्याचे समजते. दरम्यान, मृत चिमुकलीच्या मातापित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.