उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तिघेजण कोरोनाबाधित झाल्याचे रविवारी समोर आले आहे. आधीच तिघे कोरोनाबाधित सापडलेल्या कळंब तालुक्यात 2 तर भूम येथे 1 कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 7 वर गेली आहे. आज लागण झालेले तिघेही मुंबई येथून जिल्ह्यात परतले आहेत.
जिल्ह्यातील 28 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 25 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 3 पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली. यातील 2 कोरोनाबाधित हे कळंब तालुक्यातील हावरगाव येथील तर 1जण भूम येथील आहे. हे तिघेही मुंबई येथून गावी परत आले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा ग्रीनझोनमध्ये आल्यानंतर 11 मे रोजी परंडा तालुक्यातील सरणवाडी येथे 1 तरुण कोरोनाबाधित आढळून आला. त्यापाठोपाठ 13 मे रोजी एकाच दिवशी कळंब तालुक्यात 3 कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यास सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे. आता पुन्हा एकाच दिवशी आणखी 3 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. परिणामी उस्मानाबादकरांची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे सर्वांनीच आता नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे असून प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.