उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परंड्यापाठोपाठ कळंब तालुक्यात एकाचवेळी तिघांचे करोना तपासणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता अधिकच वाढली आहे. तर एका व्यक्तीचा रिपोर्ट संदिग्ध  असल्याने पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.  जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असतानाच, पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उस्मानाबादकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

परंडा तालुक्यातील सरणवाडी येथे सोमवारी करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबादमध्ये खळबळ उडाली. जिल्ह्याची घडी पावणेदोन महिन्यांतर कुठे रुळावर येत असतानाच आता आणखी रुग्ण सापडू लागले आहेत. मंगळवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 व्यक्तीचा अहवाल संदिग्ध आला असल्यामुळे त्याची उद्या पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड येथील 15 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल संदिग्ध आला असल्यामुळे त्याची उद्या पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल संदिग्धआले असल्यामुळे त्याची उद्या पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 4 व्यक्तींचे अहवाल  अनिर्णायक आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

Story img Loader