औरंगाबादमधील खोकडपुरा भागातील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात पदवी परीक्षेच्या आजच्या (गुरुवार) प्रश्नपत्रिकेदरम्यान, एकाच बाकावर तीन-चार परीक्षार्थींना बसवण्यात आले होते. अनेक परीक्षार्थीं सामूहिक कॉपी केल्यासारखे परस्परांची उत्तरे पाहून लिहित असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तत्काळ कारवाई करत विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना १ जूनपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी अनेक परीक्षार्थींना ऐनवेळी परीक्षा केंद्राचे प्रवेशपत्र मिळाले. त्यामुळे केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बीसीएच्या प्रथम व तृतीय वर्षाच्या प्रशनपत्रिकेदरम्यान विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात अचानक परीक्षार्थींची गर्दी वाढली.

रम्यान, यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाने सांगितले, की केंद्र म्हणून ४६६ परीक्षार्थींच्या नावांची यादी प्राप्त झालेली होती. मात्र अचानक सहाशेंवर विद्यार्थी वाढल्याने ऐनवेळी आसनव्यवस्थेचे नियोजन करता येणे शक्य नव्हते. आलेल्या विद्यार्थ्यांनाही परत पाठवणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यासारखे झाले असते. त्यामुळे एका आसन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना बसवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्या योगिता होके-पाटील यांनी केंद्राच्या ठिकाणी भेट दिली. या वेळी एका आसन व्यवस्थेवर तीन ते चार परीक्षार्थी आढळून आले असून येथील केंद्रावरील विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील मुद्दा विद्यापीठ प्रशासनापुढे मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घडलेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गणेश मंझा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन केली.

संबंधित परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती –

आपण स्वतः काबरा महाविद्यालयात जाऊन पाहणी केली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडे व संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रमुखांकडेही सविस्तर अ्हवाल मागवलेला आहे. हे दोन्ही अहवाल आल्यानंतर जो काही असमन्वय घडलेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे, त्यानुसार कारवाई केली जाईल. संबंधित परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. येथील विद्यार्थी इतर दोन महाविद्यालयांच्या केंद्रांवर वर्ग केले जाणार आहेत. असे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.

परीक्षा अन्य दोन महाविद्यालायत होणार –

दरम्यान, काबरा महाविद्यालयाच्या केंद्राला स्थगिती दिली असून या ठिकाणी होणारी बीएस.सी कॉम्प्युटर सायन्स व बायोटेकसाठीची परीक्षा आता मिलिंद विज्ञान व डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून कळवण्यात आले.