ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-ट्वेंन्टी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने रविवारी रविकिरण हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी दोन आरोपी विश्वचषक सामन्यासाठी चालू असलेल्या अंतिम सामन्यावर त्यांच्याकडील मोबाई वर सट्टा लावून खेळत असल्याचे आढळून आले. चौकशी दरम्यान आणखिन एक आरोपी निष्पन्न झाला. जो मुंबईतून सट्टा लावण्याचे काम पहात होता. त्याला गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतले आहे. अँड्रॉ रिचर्ड फेर्नांडिस 38 रा. सांताकृज, मानिष दौलत टुकरेल 42 रा. अंधेरी आणि राजेंद्र वडलदास भाटिया रा. शास्त्रीनगर, मुंबई अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांकडून पाच हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार आणि भारतीय तार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरु आहे. दरम्यान , आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.