पुलगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या प्रकोपात मंगळवारी आणखी एका एकाचा बळी गेला असून आतापर्यंत मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून दोघांना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
डेंग्यूने ग्रस्त असलेल्या सहा वर्षीय सक्षम शुक्ला याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यापूर्वी हिंगणघाट येथील नेहा धनाडे (८) व पलाश बनसोड (१०) यांचा डेंग्यूने बळी गेला. याखेरीज डेंग्यूमुळे गंभीर स्थितीत पोहोचलेल्या दोन रुग्णांना नागपूरला पाठविण्यात आले आहे. पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात असंख्य रूग्ण उपचार घेत असल्याची स्थिती आहे.
पुलगावात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यमुळे ही साथ अद्याप आटोक्यात न आल्याने संतप्त नागरिकांचा आरोप होतो. याविषयी पालिका मुख्याधिकारी राजेश भगत यांनी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतांनाच पालकमंत्री व या भागाचे आमदार रणजीत कांबळे यांनी शहरात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. डेंग्यूच्या उपाययोजनाबाबत स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र पुढे येत आहे. ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूच्या उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.