सांगली : रमजान ईदसाठी बाजार करून घरी परतत असताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजणेच्या सुमारास आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर डंपर चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केले.

आष्ट्याजवळ  असलेल्या शिंदे मळा येथील हॉटेल नंदनवन समोर  दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अस्पाक शब्बीर पटेल (वय ३९), मुलगा आश्रफ अस्पाक पटेल (वय १२) आणि असद अस्पाक पटेल (वय १० सर्व रा. कुंडलवाडी ता. वाळवा) हे तिघे जागीच ठार झाले तर हसिना अस्पाक पटेल (वय ३५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

पटेल कुटुंबिय रमजानचा सण सोमवारी असल्याने कपडे व सणासाठी बाजार खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून (एमएच बीडी २८१९) वरून आष्टा येथे गेले होते. साहित्य खरेदी करून सायंकाळी साडेचार वाजणेच्या सुमारास गावी परतत असताना इस्लामपूरहून सांगलीकडे खडी भरून निघालेल्या डंपरने (एमएच १० डीटी ०४६८) धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, दुचाकी चालकाच्या समोरील बाजूस चाकाखाली सापडली. या अपघातात पित्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात मृत झालेली मुले आश्रफ हा सातवीत तर असद पाचवीच्या वर्गात शिकत होता. रमजान या पवित्र सणाच्या कालावधीतच तिघांचा मृत्यू झाल्याने कुंडलवाडीत हळहळ व्ययत होत आहे. दरम्यान, अपघातानंतर लोकांची गर्दी जमली. जमाव अंगावर येत असल्याचे लक्षात येताच चालकांने डंपर जागेवर सोडून पलायन केले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रूग्णालयात धाडण्यात आले असून महिलेची प्रकृर्ती चिंताजनक आहे.

पटेल कुटुंबियानी रमजान महिन्याचे रोजे केले होते. रमजान ईद सोमवारी साजरी होणार असून याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब पटेल आष्टा येथे  बाजारासाठी गेले होते. एकाच वाहनावरून दोन मुले व पत्नी यांना घेउन त्यांनी बाजारही केला. ईदची खीर करण्यासाठी लागणारे सुकामेवा, शेवया व अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडेही खरेदी केली होती. मात्र, घरी पोहचण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.