कर्जतः तालुक्यातील ताजू गावच्या शिवारात घोड कालव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अशा तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घोड कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे गार पाण्यामध्ये पोहण्याचा मोह या परिसरातील छोट्या मुलांना झाला. दिपाली वणेश साबळे (वय १४), ऐश्वर्या वणेश साबळे (वय १०) आणि आणखी दोन लहान मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरले. मात्र, पाण्याला वेग जास्त असल्यामुळे व पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही मुले पाण्यात बुडू लागली. त्यांनी जोरात आरडाओरडा केला, त्याच ठिकाणी कृष्णा रामदास पवळ (वय २६) शेतामध्ये काम करत होते.

त्यांनी आवाज ऐकून धाव घेतली. पाण्यामध्ये उडी मारून दोघा मुलांना पाण्याबाहेर काढले आणि पुन्हा दोन मुलींना पाण्यामधून बाहेर काढण्यासाठी कालव्यात उडी मारली. मात्र, त्या दोन मुलींना वाचवताना त्यांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पवळ हे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत.

तिन्ही मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणली.

आईचा हंबरडा

रुग्णालयामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या आईने हंबरडा फोडला. एकाच वेळी स्वतःच्या दोन मुली गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा टाहो पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले.