मुरुमासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रानात शेळय़ा चारण्यासाठी गेलेल्या मुली पावसाने भरलेल्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्युमुखी पडल्या.
    पूजा रवींद्र पाटील (वय १३), निकिता रवींद्र पाटील, (वय १२) आणि ऐश्वर्या राजू धोडमणी (वय ८, रा. सालेकिरी, ता. जत) या तिघी शेळय़ा चारण्यासाठी रानात गेल्या होत्या. घरी शेळय़ा परत आल्या, मात्र मुली आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्या वेळी गावापासून १ किलोमीटर अंतरावर जेसीबीने काढण्यात आलेल्या १५ ते २० फूट खोलीच्या खड्डय़ात तिघींचे मृतदेह आढळून आले.
    जत तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या पवन चक्कीसाठी रस्ता करण्याकरिता मुरूम खुदाई करण्यात आली होती. या खड्डय़ात पावसाने किती पाणी साचले आहे हे पाहण्यासाठी एक मुलगी उतरली होती. तिचा पाय घसरल्याने पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दोघीही पाण्यात उतरल्या. या दुर्घटनेत तिघींचाही अंत झाला.

Story img Loader