अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजन समारंभाला शिवसेनेचे तिन्ही आमदार गैरहजर राहीले. त्यामुळे जिल्ह्यात महाआघाडीतील विसंवाद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तीन आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना आमदारांच्या गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही कार्यक्रमाला अनुपस्थित राहीले. शिवसेनेचे पदाधिकारीही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.

 गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार आणि पाकलमंत्री आदिती तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमत्री आदिती तटकरे यांना हटवा, अशी माणगी केली आहे. ‘कोणीही द्या, पण रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या’ अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागणीची अद्याप फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आमदारांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि पालकमंत्र्याबाबत आपली नाराजी पुन्हा एकदा या माध्यमातून व्यक्त केली.

अलिबाग तालुक्यातील उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि सर्वोपचार रुग्णालयाचा भुमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृष्यप्रणालीने उपस्थित होते. तर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे देखील या कार्यक्रमाला अनुपस्थित राहीले. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेकापचे जयंत पाटील पण गैरहजर

या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जंयत पाटील हे देखील गैरहजर राहीले. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटीलही कार्यक्रम स्थळी फिरकले नाहीत. चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पालकमंत्र्याबाबत नाराजी व्यक्त केली. आदिती तटकरे या शेकापच्या पाठींब्यामुळेच पालकमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत. याचा विसर पडू देऊ नये, असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे शेकापही आदिती तटकरे यांच्यावर नाराज असल्याची दिसून येत आहे.

 भाजपाचे तिन्ही आमदारही अनुपस्थित

 भाजपाच्या तीनही आमदारांना या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेत रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांची प्रमुख अतिथी म्हणून नावे टाकण्यात आली होती. मात्र त्यांनीही या कार्यक्रमास अनुपस्थित राहणे पसंत केले.

  सर्वांना सोबत घेऊन काम करा- बाळासाहेब थोरात

 काँग्रेसमध्येही पालकमंत्र्यांबाबत नाराजी आहे. याच नाराजीचा धागा पकडून महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर भाषणात आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांना सर्वांना सोबत घेऊन काम करा, असा सूचक टोला लगावला.