संदीप आचार्य, सुशांत मोरे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यात आणि वाहतुक सुरळीत ठेवण्यात अपयशी ठरलेल्या एसटी महामंडळाला येत्या काळात विनावापरामुळे नादुरुस्त बनलेल्या बसगाडय़ांचा नवा खर्च सहन करावा लागणार आहे.

 एसटी गाडय़ा जागेवर उभ्या राहिल्याने पाच महिन्यांत तीन हजारपेक्षा जास्त एसटी गाडय़ा नादुरुस्त झाल्या असून त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळाला खर्च येणार आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. अद्यापही हा संप सुरुच असून ८२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३८ हजार ६०० कर्मचारी संपात सहभागी आहेत. महामंडळात एकूण ५३ हजार चालक, वाहक असून त्यापैकी ३३ हजार चालक, वाहक संपात आहेत. त्यामुळे सेवेत आलेले चालक, वाहक, कार्यशाळा व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दररोज ६ हजार बसगाडय़ांच्या १६ हजारपेक्षा जास्त बस फेऱ्या चालवल्या जात आहेत. यातून साधारण १२ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात.

संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या असून कारवाया मागे घेण्यासही महामंडळाला सांगितले आहे. त्यानुसार महामंडळाने कारवाया मागे घेण्याचेही परिपत्रक काढले. यानंतर गेल्या काही दिवसांत एसटीत चालक, वाहकांसह अन्य कर्मचारी रुजू होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण काही दिवसांत आणखी वाढले,तर प्रवाशांना पूर्वीसारखी बस सेवा देण्यास मात्र महामंडळाला अडचण येऊ शकते. महामंडळाकडे १६ हजार बसगाडय़ा असून यातील तीन हजार बस नादुरुस्त झाल्या आहेत. पाच महिन्यातील संपकाळात बस उभ्याच आहेत. त्याची दुरुस्ती केल्याशिवाय या बस धावूच शकत नाहीत. जसजसे मनुष्यबळ उपलब्ध होत गेले, त्यानुसार काही एसटी बस आगारातच चालवून व त्याची देखभाल, दुरुस्ती केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

११ एप्रिल २०२२ ला एसटी महामंडळानेही दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी पूर्ववत करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्याचे सांगितले होते.

झाले काय? बसचा वापरच होऊ न शकल्याने बसचे इंजिन, त्याची बॅटरी व अन्य उपकरणे खराब झाली आहेत. या बस धावणे कठीण असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी महामंडळाला साधारण १४० कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संप मिटला तरी..

राज्यातील एसटी सेवा संप मिटवून सारे कर्मचारी कामावर परतले, तरी नादुरुस्त बसमुळे महामंडळाला बसची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे आता आहे, तशीच स्थिती पुढील काळातही राहू शकते, अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three thousand buses of msrtc improper in five months zws