महाराष्ट्राचे समृद्ध जंगलक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात गेल्या १२ दिवसांत तीन पट्टेदार वाघ गमावले आहेत. तसेच व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गावर भरधाव वाहनांची धडक, जंगली कुत्र्यांचे हल्ले यात एक अस्वल तसेच अस्वलांचे दोन बछडे ठार झाले आहेत. दोन बिबटय़ांच्या अपघाती मृत्यूची घटना उघडकीस आली असून महिनाभरातील मृत पावलेल्या प्राण्यांची संख्या दहा झाली आहे.
 पेंच व्याघ्र प्रकल्पात चार दिवसांपासून वाघ मरून पडला असताना गस्ती पथकाला त्याची माहिती नव्हती. वन्यजीवांच्या मृत्यूच्या बहुतांश घटना जंगलात गेलेल्या रहिवाशांनी वन विभागाला कळविल्या आहेत. हा अत्यंत बेजबाबदार प्रकार असल्याने पर्यावरणप्रेमींनी याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर सोनझरी तलावाकाठी नरभक्षक वाघिणीला १२ जानेवारीला गोळ्या घालून ठार केल्याची गंभीर दखल नेदरलँडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी खासदार मनेका गांधी यांनी घेतल्याने या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. व्याघ्रहत्येची पुनरावृत्ती गोंदियात झाल्याने संतप्त झालेल्या वन्यजीवप्रेमींनी एकत्र येऊन मनेका गांधी व नेदरलँडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडे तक्रार दाखल केली. यातच गेल्या बारा दिवसांत तीन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला. वाघ वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजावाजा करून मोहिमा राबविल्या जात असताना विदर्भात वाघांचे मृत्युसत्र चिंतेचा विषय ठरला आहे. ६ जानेवारीला ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात एकारा (भुज) येथे वाघ मृतावस्थेत आढळला. तर १७ जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने वन विभाग हादरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा