राहाता : शिर्डी लोकसभा राखीव मतदारसंघात महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट), महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे (शिंदे गट) व वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्या तिरंगी लढतीत मतविभाजनाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे.
खासदार पदाची मुदत संपल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचा दहा वर्षे मतदारांशी नसलेला संपर्क, तर विद्यामान खासदार सदाशिव लोखंडे यांनी दहा वर्षे न केलेली विकासकामे यामुळे या दोघांविषयी मतदारांत नाराजी होती. उत्कर्षा रुपवते यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘वंचित’मध्ये प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतल्याने निरुत्साही निवडणुकीत चुरस निर्माण झाली. या मतविभागणीचा फायदा कोणाला मिळणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा >>> नगर : मतांच्या ध्रुवीकरणावर थेट लढतीचा कौल
वाकचौरे व लोखंडे यांनी प्रचारात परस्परांवर घोटाळ्यांचे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, दोघांकडून विकासकामे व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली नाही. मतदारसंघातील अनेक भागांत पाणी प्रश्न गंभीर आहे. निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीकडे झालेल्या दुर्लक्षाने जिरायती टापूतील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका कोणाला बसणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील सिंचन धोरणातून शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या घोषणांची पुनरावृत्ती झाली. परंतु प्रत्यक्षात कुठली हालचाल झालेली नाही. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक तीर्थक्षेत्र. त्याच्याही विकासाबद्दल प्रचारात ऊहापोह झाला नाही.
ग्रामीण भागात मतदानात चुरस पाहायला मिळाली. शेतकऱ्यांमध्ये कांद्याचे पडलेले दर, दूधदर यामुळे रोष होता. तो मतपेटीतून व्यक्त होईल का, याकडे लक्ष राहील. शहरी भागात एकगठ्ठा मते कोणाकडे जातील याची आकडेमोड केली जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महायुतीची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला; परंतु या कार्यकर्त्यांनी किती प्रामाणिकपणे काम केले यावर लोखंडे यांचे भवितव्य अवलंबून आहे. ह्यवंचितह्णच्या उमेदवार रुपवते मूळ थोरात गटाच्या. या सहानुभूतीचा त्या किती लाभ उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. लढत जरी तिरंगी झाली, तरीही ती अप्रत्यक्षपणे मतदारसंघावर वर्चस्व कोणाचे? महसूल मंत्री विखे की माजी महसूलमंत्री थोरात यांचे, हेच दाखवणारी ठरेल.