कराड : शेतकामासाठी गेलेल्या आईच्या दिशेने निघालेल्या तीन वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने चढवलेल्या हल्ल्यात या बालकाचा अंत झाल्याची हृदयद्रावक घटना कराड ग्रामीण परिसरातील वाखाण भागात आज सोमवारी दुपारी घडली.
राजवीर राहूल होवाळ (रा. जगताप वस्ती, वाखाणभाग कराड) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या खळबळजनक घटनेने कराडकरांमधून संताप व्यक्त होत असून, भटक्या कुत्र्यांचे उपद्रव रोखण्यासाठी ठोस उपायांची सर्वत्र मागणी होत आहे. पोलिसांकडील माहिती अशी, की होवाळ कुटुंब जगताप वस्तीत वास्तव्यास असून, राजवीर याची आई शेतात गेली होती. त्यावेळी राजवीर हा घराजवळच खेळत होता. तो खेळत, खेळत आई शेतकामासाठी गेलेल्या दिशेने रस्त्यावरून जात असतानाच जवळपास पंधरा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने राजवीर याच्यावर एकच हल्ला चढवला. कुत्र्यांच्या कळवंडीने राजवीरला फरपटत बाजूला नेले. त्यात तो गतप्राण झाला. तर, दुसरीकडे राजवीरची शोधाशोध सुरु होती. यावेळी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात राजवीरचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित बाबर यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.