कराड : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाटलेले पाच लाख रूपये सतत मागणी करीत असल्याने पैशासाठी तगादा लावणाऱ्या युवकाला कर्नाटकमधून आणून त्याचा निर्दयीपणे खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा तळबीड पोलिसांनी कमालीच्या बुध्दीचातुर्याने आणि प्रचंड मेहनतीने उघडकीस आणला आहे.
पुणे – बंगळुरु महामार्गाकडेच्या नाल्यात वनवासमाची (ता. कराड) येथे एका युवकाचा जळालेला मृतदेह मिळून आला होता. या खून झालेल्या युवकाची ओळख पोलिसांना पटली आहे. संबंधित युवकाचा खून पाच लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून झाला आहे. या गुन्ह्यातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघांना पोलीस कोठडी मिळाली आहे .तर, मृतदेह जाळताना भाजून जखमी झालेल्या एकावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराडमध्ये दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, तळबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक राहूल वरूटे हे उपस्थित होते.
समीर शेख म्हणाले की, या प्रकरणात खून झालेल्या युवकासह त्याचा खून करणारे हे सर्वजण कर्नाटक राज्यातील आहेत. केशवमुर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय ३७, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळूरू) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तसेच मृत केशवमुर्ती त्याच्या परिचयातील तिघांनी त्याला वनवासमाची (ता. कराड) येथे आणून त्याचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपाधीक्षकांचे पथक व तळबीड पोलिसांनी संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास करताना, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या तीन दिवसात गुन्ह्याचे धोगेदोरे शोधून काढले. केशवमुर्ती यास निदर्यीपणी जाळून मारल्याबद्दल त्याच्याच गावातील मंजुनाथ सी (३३, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू) व शिवानंद बिराजदार (२६, रा. विजापूर) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, केशवमुर्ती याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळताना एक संशयीत भाजला आहे. हा संशयित जखमी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशांत भिमसे बटवाल (रा. वमनेल-सिंगदी, जि. बिजापूर) असे त्याचे नाव आहे.
पोलीस उपाधीक्षक ठाकूर म्हणाले, केशवमुर्ती याच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधितांनी केशवमुर्तीकडून पाच लाख रूपये घेऊन त्याला नोकरी लावतो असे आमिष दाखवले होते. परंतु, या पैशाचा तगादा केशवमुर्ती याने संबधितांकडे लावला होता. त्याला वैतागून त्यांनी केशवमुर्ती याचा खून केला. यामध्ये संबधितांनी चारचाकी गाडी वापरली आहे. खून झालेला केशवमुर्ती आणि संशयितांचे नातेसंबध आहेत. तरीही त्यांनी केशवमुर्ती याचा अत्यंत निर्दयीपणे खून केला आहे.