शहरातील रेल्वे स्थानक परिसरात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी शहरातील तीन युवकांना अटक केली आहे. या तिघांना १० दिवसांच्या (दि. २९) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज, शनिवारी दिला. खून झालेल्या या तरुणीची ओळख दोन दिवसांनंतरही अद्यापि पटलेली नाही.
वैभव देवीदास म्हस्के (२६, बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन रस्ता, नगर) अरुण बाबासाहेब घुगे (१८, दीपनगर, केडगाव) व विशाल अरुण शिंदे (२४, तागडवस्ती, पाइपलाइन रस्ता, नगर) अशी तिघा आरोपींची नावे आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील करत आहेत.
गुरुवारी रात्री नगर-दौंड रेल्वे रुळावर, नगर स्थानकालगत काटेरी झुडपात तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती स्टेशन मास्तर दास यांनी पोलिसांना दिली होती. तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. चप्पल जोड, शर्ट पडलेले होते. तरुणीच्या चेह-यावर कठीण वस्तूने मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे बलात्कार करून खून केल्याचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती मिळाल्यानंतर केलेल्या चौकशीत पोलिसांना रेल्वे स्टेशनमधील तीन तरुणांनी या तरुणीला रात्री अकराच्या सुमारास बळजबरीने उचलून नेल्याची माहिती मिळाली, ही तरुणी स्थानकावरच उभी होती. तिघांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. हे तिघेही तरुण रेल्वे फलाटावर उडाणटप्पूगिरी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा