सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी रात्री सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर निळी शाई फेकण्यात आली. या घटनेमुळे तेथे गोंधळ उडाला. शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ एका संघटनेच्या कार्यकर्त्याने पाटील यांच्या अंगावर निळी शाई फेकल्याची माहिती समोर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पोलिसांनी भीमा इर्मी संघटनेचा म्हणविणा-या अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाला जागेवर  ताब्यात घेतले. या घटनेमुळे शासकीय विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. पालकमंत्री पाटील यांचे रात्री सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गेल्या महिन्यात याच शासकीय विश्रामगृहात तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना धनगर आरक्षण कृती समितीचा समन्वयक  यांच्या अंगावर शेखर बंगाळे याने धनगर आरक्षण प्रश्नावर लक्ष वेधत निवेदन देताना त्यांच्या डोक्यावर भंडारा उधळला होता.

हेही वाचा >>> लातूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, फुगेवाल्याचा जागीच मृत्यू; ७ ते ८ मुले गंभीर जखमी

शासकीय विश्रामगृहात येणा-या प्रत्येक मंत्र्याच्या भेटीप्रसंगी आंदोलनाच्या रूपाने कोणतेही आक्षेपार्ह प्रकार घडू नयेत म्हणून पोलिस सतर्क आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या आगमनाप्रसंगी विश्रामगृहात येणा-या प्रत्येकाची पोलीस कसून तपासणी करीत होते. यापूर्वी विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळलेल्या शेखर बंगाळे हा सुध्दा चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी आला होता. परंतु पोलिसांनी सतर्कता बाळगून त्यास ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाने पोलिस सुरक्षा पार करून पालकमंत्र्यांना भेटताना त्यांच्या अंगावर शाईफेक केली. त्याने काळा झेंडा दाखवत, भारतीय जनता पार्टी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि लगेचच शाईफेक केली. त्यामुळे गोंधळ झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Throw the ink guardian minister chandrakant patil was insulted in solapur ysh
Show comments