महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटात, गारांच्या वर्षांवात अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. वासाळे (ता. वाई) येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
आज दुपारी चारच्या सुमारास महाबळेश्वर भिलार, पाचगणी आणि वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला. अर्धा ते पाऊण तासात विजांच्या कडकडाटात आणि गारांच्या वर्षांत जोरदार पाऊस झाला.
महाबळेश्वरच्या परिसरात तर रस्त्यावर गारांचा थर जमा झाला होता. तापोळा रस्त्यावर अध्र्या फुटाचा गारांचा थर जमा झाला होता. अचानक आलेल्या पावसाने आणि गारांचा थर पाहून पर्यटक सुखावले. तापोळा रस्त्यावर पर्यटकांनी याचाही मोठा आनंद लुटला.
पाचगणी, भिलार परिसरातही असाच मोठा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने सर्व जण सुखावले होते. या गारांचा जोरदार मारा झाल्याने स्टॉबेरी पिकावर याचा मोठा परिणाम होणार आहे.
वाईच्या पश्चिम भागातही गारांचा मोठा पाऊस झाला. या वेळी विजाचाही मोठा कडकडाट होता. शेतामधल्या काम करणाऱ्यांचीही धांदल उडाली. यातच वासोळे (ता. वाई) येथे धुळा नावाच्या शिवारात शेतात सातआठ महिला काम करत होत्या. जोरदार पाऊस आला म्हणून त्या शेतातीलच आडोशासाठी उभ्या होत्या. या वेळी वीज पडून द्रौपदा चंद्रकांत तुपे (४०) या जागीच मृत झाल्या तर अर्चना दगडू तुपे (२७) व चंद्रभागा राजाराम तुपे (४०) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर वाईतील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा