रत्नागिरी – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाने कंबर कसली आहे. विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात विधानसभेसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.

हेही वाचा – चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला

श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत अशी शक्यता आहे. विपुल कदम हे खेडमधील तळेगावचे रहिवासी आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. पितृपक्ष संपल्यानंतर लवकरच शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे. मात्र भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नीलेश राणे हे कुडाळ किंवा गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : “…तर खात्यात होणार नाहीत कोणतेच शासकीय व्यवहार”, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं!

गेल्या काही महिन्यांत नीलेश राणे यांचे गुहागरमधील दौरे वाढले असून त्यांची गुहागरमधील सभाही चांगलीच गाजली होती. तेव्हापासूनच नीलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या मतदारसंघातून विपुल कदम यांना उमेदवारी मिळाल्यास नीलेश राणे यांचे गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. विपुल कदम रिंगणात उतरल्यास गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. गुहागर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी भाजपकडून माजी आमदार विनय नातू हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.