धवल कुलकर्णी
रविवारी विदर्भातील पवनी सह वनक्षेत्रात मौजे सावरला मध्ये पहाटे मोहफुल गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या ममता शेंडे या मजुरी करणाऱ्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावरला गावापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या राखीव वनात घडली. वनविभागामार्फत मृत महिलेच्या कुटुंबीयांना रुपये पंचवीस हजारांची तात्काळ मदत देण्यात आली आहे. पती समोरच वाघाने पत्नी वर हल्ला केला. पतीने केलेल्या आरडाओरडा मुळे वाघ पळून गेला.
सध्या सुरू असलेल्या टाळेबंदी च्या कालावधीमध्ये शेतकरी व शेतमजूर अनेक संकटांमध्ये अडकले आहे. एकीकडे मालाला बाजारपेठ आणि भाव नाहीत आणि दुसरीकडे मानव व वन्यजीव संघर्ष. मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांवर सुद्धा वन्य श्वापदांची कडून हल्ला होण्याची भीती आहे.
त्याचबरोबर पवनी वनपरिक्षेत्र मार्फत जंगलात जाताना घ्यावयाची काळजी व मानव व वन्यजीव संघर्ष टाळणे बाबत पत्रके यापूर्वी सदर गावांमध्ये वाटण्यात आली आहेत. वनविभागाने असे आवाहन केले आहे कि वन प्राण्यांपासून सावध राहावे व शक्यतो जंगलात जाणे टाळावे. मोह फुले गोळा करताना बसून गोळा नकळता काळजीपूर्वक उभे राहूनच करावे व शक्यतो जंगलात जाणे टाळावे असे आवाहन भंडारा वन विभागामार्फत ग्रामस्थांना करण्यात आले आहे.