ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मूल वनपरिक्षेत्रातील फुलझरी गावाजवळ दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. गेल्या बारा दिवसांतील वाघाच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे.

मूल वनपरिक्षेत्रांतर्गत जानाळा बिटातील फुलझरी गावालगतच्या जंगलात कक्ष क्रमांक ३५५ मध्ये बुधवारी दुपारी वन पथकाला वाघाचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. तसेच त्याचे पोट, मान व पायाचे लचके अन्य वन्यप्राण्यांनी तोडले होते. प्राथमिक अंदाजानुसार वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (बफर) उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने यांनी सांगितले.