चंद्रपूर : ताडोबा बफर क्षेत्रालगतच्या दुर्गापूर, ऊर्जानगर, नेरी व कोंडी येथे गेल्या काही महिन्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर वनविभागातर्फे या भागात १.२५ किलोमीटर लांब आणि १५ फूट उंच जाळी बसवण्यात येत आहे. यावर सौरदिवेही लावले जातील.

दुर्गापूर, ऊर्जानगर नेरी व कोंडी या परिसरातील ३ जणांना वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांत वनविभागाविरोधात रोष आहे. वनविभागाने यावर तत्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वेकोलि प्रशासन, ग्रामपंचायत आणि वनविभागाकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वी एका ८ वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर भटारकर यांनी वेकोलि व्यवस्थापकांच्या कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर येथील झुडपी जंगल परिसराची स्वच्छता करण्यात आली.

ग्रामपंचायतद्वारे गावातील कचरा जेथे फेकला जातो, तेथे बिबट्या आणि वाघाचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर वन विभागातर्फे असुरक्षित असलेल्या १.२५ किलोमीटर लांबीच्या परिसरात सौरदिव्यांसह १५ फूट उंच जाळी लावली जात आहे. यामुळे वाघ आणि बिबट्याची मानवी वस्तीतील घुसखोरी काहीप्रमाणात थांबेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Story img Loader