मेळघाटातील वाघांच्या शिकार प्रकरणांमध्ये नेपाळ आणि नवी दिल्ली येथील शिकारी टोळयाही गुंतल्या असल्याचे स्पष्ट झाले असताना हाती लागलेल्या तस्करांच्या टोळीच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे आव्हान आता वन विभागासमोर आहे.
शिकाऱ्यांच्या टोळीचा माग घेत असताना वनाधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गेल्या ७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथून सरजू बावरिया या आंतरराष्ट्रीय शिकाऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात यश मिळाले होते.आरोपींकडून वाघाचे कातडे, २० किलो वाघाची हाडे आणि ५२ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीच्या विरोधात वन विभागाने उघडलेल्या मोहिमेला लाभलेले अलीकडच्या काळातील मोठे यश मानले गेले. दिल्लीत झालेल्या तपासानंतर सरजूला नागपूर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. सरजू सोबतच ताब्यात घेण्यात आलेले नरेश शर्मा आणि टोळीला रसद पुरवणारा सूरज पाल ही दोघे चौकशीसाठी वन विभागाला हवी आहेत, पण सध्या ते न्यायालयीन कोठडीत तिहार कारागृहात आहेत. या तिघांच्या चौकशीनंतरच तपास कामाला वेग येऊ शकेल, असे वन विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीवांच्या व्यापारास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, या तरतुदींचा भंग केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा २५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारची एकत्रित शिक्षा होऊ शकते. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात झालेल्या गुन्ह्य़ासाठी यात वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. पण, पुरेशा पुराव्याअभावी आरोपी सुटतात, असा अनुभव असल्याने वन विभागाने या तस्करांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. न्यायवैद्यक शास्त्राचा वापर करून आरोपपत्र भक्कम करण्यावर वनाधिकाऱ्यांचा भर आहे. वन्यजीवांच्या व्यापारास बंदी असली, तरी हा मोठा अवैध उद्योग बनला असून, चीन अशा व्यापाराचे मोठे केंद्र बनले आहे.
मेळघाटातून वाघ आणि बिबटय़ाची कातडी तसेच त्यांच्या इतर अवयवांची तस्करी केली जाते. मेळघाटातील शिकारीत बहेलिया टोळी गुंतलेली असल्याचे निदर्शनास आले होते. ऑगस्टमध्ये या टोळीतील काही सदस्यांना पुण्याहून अटक करण्यात आली होती.
या टोळीचे संबंध हे दिल्ली येथील तस्करांशी आहेत, आणि हे तस्कर आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध ठेवून आहेत, असे दिसून आले होते. पण, आजवर तस्करांच्या मुळापर्यंत जाणे महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांना शक्य झाले नव्हते. मेळघाटातील घटांग परिक्षेत्रात एका पानवठय़ाजवळ दोन बिबटय़ांची शिकार करण्यात आली होती. शिकाऱ्यांनी वाघाला अडकवण्यासाठी सापळे लावले होते, पण त्यांच्या हाती बिबटे लागले, अशी माहिती समोर आली आहे.
तपशील गोळा करावा लागणार
बहेलिया टोळीतील सदस्यांनी या शिकारीची कबुली दिली आहे. उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शिकारस्थळावरून पुरावे गोळा करण्यात यश मिळवले आहे. शिकाऱ्यांच्या आणि तस्करांच्या टोळीचे प्रत्यक्ष संबंध आणि त्यांच्यातील व्यवहारांचे बारीकसारीक तपशील गोळा करण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. सूत्रधार सरजू याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे अमरावती वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच तो अमरावती वन विभागाच्या ताब्यात येऊ शकेल. आता वन विभागाने बहेलिया टोळीच्या विरोधातही फास आवळणे सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा