आक्रसत चाललेला जंगलांचा आकार, नष्ट होत चाललेल्या वन्यप्रजाती अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची सुवार्ता आहे. वाघांची संख्या १६० वरून २०० झाली असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी येथे दिली. चालू वर्षी झालेल्या वन्यप्राणी गणनेवरून ही ताजी आकडेवारी वनमंत्र्यांनी जाहीर केली.
वाघांच्या ढासळत्या संख्येवरून सर्वत्र चिंतेचा सूर उमटत असतानाच वाघांच्या संख्येने २००चा पल्ला गाठल्याचे वनमंत्र्यांनी येथे सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील वाघांच्या संख्येत वाढ होणे ही समाधानाची बाब असून वाघांचे वास्तव्य असणाऱ्या अभयारण्यानजीकच्या १७ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. वन विभागात २००५ वनरक्षक व २५० अधिकारी नव्याने भरती करण्यात आले आहेत. तसेच जंगलातील प्रत्येक झाडाची नोंद घेणारे आणि या झाडाची हालचाल दर्शविणारे यंत्र प्रत्येक वनरक्षकाकडे देण्यात येणार असून त्याचा सातत्याने मागोवा घेतला जाईल. वनक्षेत्राचे नकाशे नव्याने तयार करण्यात येत असून या झाडांची नोंद या यंत्रावर केली जाईल ही कारवाई होण्यास एक वर्षांचा अवधी लागणार असून त्यानंतर उपग्रहाद्वारे जंगलातील हालचाली लक्षात येतील.  
नागपूर जिल्ह्य़ातील बोरेवाडी व मुंबई नजीकचे बोरेगाव या ठिकाणी जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्याचा वन विभागाचा प्रस्ताव असल्याचेही डॉ. कदम यांनी सांगितले. वन क्षेत्रातील वृक्षतोड थांबविण्यासाठी आदिवासी लोकांना वन विभागाने स्वखर्चाने स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला असून पहिली दोन वर्ष ८ त्यानंतर ६ व ४ असे सिलिंडर त्यांना वन विभाग सवलतीच्या दरात देत असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.
सांगलीत ‘फॉरेस्ट अ‍ॅकॅडमी’
सांगली जिल्ह्य़ात कुंडल येथे वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी फॉरेस्ट अ‍ॅकॅडमी मंजूर करण्यात आल्याची माहितीही वनमंत्र्यांनी या वेळी दिली. अशा पद्धतीची महाराष्ट्रातील ही पहिली व देशातील चौथी अ‍ॅकॅडमी असणार आहे. देशात कोईमतूर, डेहराडून व हैदराबाद या ठिकाणीच अशा पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. कुंडल येथे होणाऱ्या या संस्थेत देश पातळीवरील निवडक तरुणांना या ठिकाणी वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अ‍ॅकॅडमीची एक शाखा चंद्रपूरलाही असेल.