विदर्भातील मृत्युसत्रामुळे वन विभाग हादरला

चिखलदरा तालुक्यातील मोथा गावाजवळच्या कपारीत शुक्रवारी वाघाचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच ते कळू शकेल, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

विदर्भात वाघांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने वन विभाग हादरला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वन परिक्षेत्रातही एका वाघाचा मृतदेह आढळला होता.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वन परिक्षेत्रातील मोथानजीक बीट वनरक्षक पी. पी. साबळे आणि वनमजूर आमऱ्या निखाडे शुक्रवारी दुपारी गस्तीवर असताना एका कपारीत त्यांना वाघाचा मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती क्षेत्र सहायक सी. बी. खेरडे यांना दिली. या घटनेची माहिती पूर्व मेळघाट उपवनसंरक्षक कार्यालयाला देण्यात आली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल, अशी माहिती वन विभागाने दिली.

मृत्यू नेमका कशामुळे?

वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा किंवा व्रण आढळलेले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, असा प्रश्न आहे. काही महिन्यांमध्ये अनेक वन्यजीवांवर विषप्रयोग झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या वाघाचा मृत्यू झाल्यास त्या परिसरातील कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठय़ांची तपासणी करण्यात येते. त्यातून घातपातासंबंधी पुरावे हाती लागू शकतात.

Story img Loader