भारतात वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असताना, महाराष्ट्रातील संख्या मात्र समाधानकारक वाढलेली नाही. २०१०च्या व्याघ्रगणनेच्या तुलनेत २०१४ च्या व्याघ्रगणनेत केवळ साडेबारा टक्केच वाघ महाराष्ट्रात वाढले आहेत. गेल्या गणनेत महाराष्ट्रात १६९ वाघ होते. ते यंदा एकवीसने वाढून १९० झाले आहेत. त्या तुलनेत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात शिकारीचे प्रमाण मात्र अधिक आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन वर्षांत शिकाऱ्यांनी प्रचंड उच्छाद मांडला. पहिल्या वर्षांत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तर दुसऱ्या वर्षांत मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पांसह उमरेड-कऱ्हांडला, बोर अभयारण्ये शिकाऱ्यांनी लक्ष्य केली. गेल्या वर्षांत २० शिकारीचे प्रकार उघडकीस आले. त्यातील १४ वाघांच्या शिकारीचे प्रकरण न्यायालयात आहे. यातील काही आरोपी पकडण्यात वनखात्याला यश आले असले तरी किमान २५ आरोपी अजूनही फरार आहेत. तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांनी हे शिकार प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नुकतीच या अधिकाऱ्याने दिल्ली येथील मुख्यालयात यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
* देशातील १८ राज्यांमध्ये सुमारे ३ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्रात व्याघ्रगणना पार पडली.
* जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारतात या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह आहे.
* कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात वाघांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली.
देशभरातील विविध व्याघ्र प्रकल्पात २ हजार २२६ वाघ
वास्तव्य करत असल्याचे २०१४ ला झालेल्या व्याघ्रगणनेनंतर स्पष्ट झाले आहे. २०१० च्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या १७०६ होती. केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाने मंगळवारी हा अहवाल जाहीर केला. व्याघ्रगणनेतून समोर आलेल्या या आकडेवारीत जगभरातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader