राज्यातील वाघांच्या शिकारीचा मुद्दा गाजत असतानाच वन्यजीव प्रेमींसाठी एक सुखद बातमी आहे. राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, दोन वर्षांपूर्वी १६९ असलेल्या वाघांचा आकडा आता २०० वर पोहोचला आहे, विशेष म्हणजे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बछडय़ांची मोजदाद करता यात आणखी भर पडू शकते.
पुण्यात गुरुवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली. या वेळी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम, सचिव प्रवीणसिंह परदेशी व इतर अधिकारी उपस्थित होते. वन्यजीव मंडळाच्या बैठकीत विविध मुद्दे चर्चिले गेले. त्यात वाघांच्या संवर्धनासाठी असलेल्या राज्यातील मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव या व्याघ्र प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. ‘राज्यात २०१० साली झालेल्या व्याघ्र गणनेत पूर्ण वाढलेले १६९ वाघांची गणना झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या गणनेत हा आकडा वाढून २०० च्या वर गेला आहे. त्यात दोन वर्षांपेक्षा लहान बछडे मोजण्यात आलेले नाहीत. ही वाढ लक्षणीय आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिकार रोखण्यासाठी राज्य वन्यजीव दल
कोयना व चांदोली वनांच्या परिसरात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील (कोअर एरिया) काही गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. याशिवाय शिकार रोखण्यासाठी राज्यात वन्यजीव दल (स्टेट वाइल्डलाइफ फोर्स) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तसे करणारे महाराष्ट्र राज्यातील दुसरेच राज्य असेल. त्यमुळे वाघाबरोबरच इतर वन्यजीवांची शिकार व तस्करी रोखणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय अनेक अभयारण्याच्या क्षेत्रातून विजेच्या ११ केव्हीपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहिन्या जात असतील, तर त्या वापरून वाघांना विजेचा धक्का देऊन शिकार केली जाते किंवा अपघातानेसुद्धा वाघ मरतात. त्यामुळे आता या वाहिन्या भूमिगत करण्याचे किंवा त्यांना कोटिंग करण्याच्या सूचना आहेत. त्यांचा अभ्यास योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा