सोलापूर : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून बार्शी व शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी भागात वावर असलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनखात्याची यंत्रणा अद्यापि यशस्वी झाली नसताना या वाघाने बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी गावच्या शिवारात जनावरांच्या गोठ्यात शिरून गायीच्या वासराची शिकार केली.
पिंपळवाडी येथील सोमनाथ भानुदास सुरवसे यांच्या गोठ्यात रात्री अंधारात वाघाने अचानकपणे शिरकाव केला. काही क्षणात वाघाने तेथील एका धाब्यावर हल्ला करून ओढत काही अंतरावर नाल्यात नेले. वासराचा पाय आणि मागील भाग वाघाने फस्त केल्याचे दिसून आले. सुरवसे यांच्या गोठ्यात १२ जनावरे होती. त्यातील बाहेर बाजूस असलेल्या एका वासरावर वाघाने झडप घालून हल्ला केला. दरम्यान, पहाटे सोमनाथ सुरवसे हे गोठ्यात गेल्यानंतर वासरू दिसून न आल्याने आसपास शोध घेतला असता गोठ्याच्या जवळ वाघाच्या पायाचे ठसे दिसून आले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन त्याची पडताळणी केली असता वाघाचा वावर स्पष्ट झाला.
त्यानंतरही ढेंबरेवाडी परिसरात तलावाजवळ वन खात्याच्या सापळा कॅमेऱ्यात वाघाची छबी सकाळी सहाच्या सुमारास कैद झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ बार्शी व येडशी परिसरात भटकत असलेल्या वाघाने आतापर्यंत २८ जनावरे फस्त केली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून भटकत सुमारे पाचशे किलोमीटर दूर अंतरावर धाराशिव जिल्ह्यातील येडशी आणि त्यालगत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात रामलिंग अभयारण्य व अन्य भागात वाघ भटकत आहे. वाघाला पकडण्यासाठी दोन पथकांनी मोहिमा उघडल्या खऱ्या; परंतु त्यात अद्यापि यश आले नाही.