सोलापूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून तब्बल ५०० किलोमीटर दूर अंतर कापून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आलेल्या वाघाचे दर्शन गुरुवारी पुन्हा झाले. दिवसभरात वाघाने कोणत्याही जनावरावर हल्ला करून शिकार केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गेल्या शनिवारी धाराशिव-सोलापूर सीमेवर येडशीजवळ सर्वप्रथम वाघाचे दर्शन झाले होते. नंतर हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रामलिंग अभयारण्य परिसरातील काही गावांमध्ये दिसून आला. ढेंबरेवाडीत तलावाच्या काठावर पाणी पिण्यासाठी आलेल्या या वाघाची छबी सापळा कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या चारे गावच्या शिवारातही सापळा कॅमेऱ्यातून वाघाचे दर्शन झाले. गेल्या तीन चार दिवसांत वाघाने काही जनावरांची शिकार केल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती.
हेही वाचा >>> मिरची उत्पादन घटल्याने लाल तिखट महागण्याची चिन्हे
दरम्यान, आतापर्यंत वाघाने एकाही व्यक्तीवर हल्ला केला नसला तरी त्याची मोठी दहशत परिसरातील गावांमध्ये कायम असताना गुरुवारी येडशीपासून बार्शी तालुक्यातील हद्दीत कारी-नारी गावांच्या परिसरात राम नदीजवळ वाघ फिरताना गावकऱ्यांच्या नजरेस पडला. त्यामुळे तेथे दहशत निर्माण झाली आहे. वाघाला पकडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी वन खात्याने अद्यापि पावले उचलली नाहीत. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या आदेशाची वाट पाहिली जात आहे. दरम्यान, बार्शीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बार्शी परिसरात वास्तव्यास असलेल्या वाघाची दहशत पसरल्याची माहिती त्यांच्या कानावर घातली. वाघाला पकडण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी आणि बार्शी परिसरात शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर गणेश नाईक यांनी पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.