Tiger Traveled From Yawatmal To Solapur : यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात जन्मलेला वाघ ५०० किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळ ते धाराशिव आणि पुढे सोलापूरपर्यंत पोहचला आहे. सध्या या वाघाची दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या वाघाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वाघाच्या पुढील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सध्या वाघ असलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. सध्या हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या सोलापूरात फिरत असलेला हा वाघ २०२२ मध्ये यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव अभियारण्यात टी-२२ वाघिणिच्या पोटी जन्माला आला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली होती. यानंतर वन विभागाने कॅमेरे लावले होते. यामध्ये वाघ टिपला गेला आहे. या वाघाचा धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे असलेल्या रामलिंग वन्यजीव अभियारण्यात पहिल्यांदा प्रवेश झाला होता. त्यानंतर तो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आला. याबाबत मिड-डे ने वृत्त दिले आहे.
अधिकारी काय म्हणाले?
या वाघाच्या प्रवासाबाबत बोलताना वन विभागाचे अधिकारी, बी. ए. पोळ म्हणाले की, “कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून आमचे पथक या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. या वाघाच्या परिसरातील वावरामुळे नागरिक आणि वाघातील संघर्ष टाळण्यसाठी विविध गावांना भेट देत याबाबात जागरूकता निर्माण करत आहोत.”
या वाघाबाबत बोलताना पोळ पुढे म्हणाले की, “वाघाने आधी टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून पैनगंगा वन्यजीव अभयारण्यापर्यंत प्रवास केला. पुढे तो मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात दाखल झाला. यानंतर शेवटी हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आला होता. आता वाघाने पुन्हा धाराशिवकडे प्रवास सुरू केला आहे.”
टी३सी१ ने केला होता ३३० किलोमीटरचा प्रवास
वाघांनी लांब पल्ल्यांचा प्रवास करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२१ मध्ये टी३सी१ या वाघाने टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून औरंगाबादमधील गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्यापर्यंत ३३० किलोमीटरचा प्रवास केला होता. यामध्ये विशेष असे की, वाघाचा पांढरकवडा ते गौताळा दरम्यानचा हा प्रवास कोणत्याही मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांशिवाय झाला होता. हा वाघ १५ मार्च २०२१ मध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला होता. १९४० नंतर गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्यात दिसलेला हा पहिला वाघ होता, असेही मिड-डेच्या वृत्तात म्हटले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd