भंडारा वनविभागात पेंच कॉरिडॉरजवळ मुदतबाह्य औषधांचा साठा सापडल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कोका वन्यजीव अभयारण्याच्या कोअर क्षेत्रातही मुदतबाह्य औषधांचा साठा सापडला होता. वाघांचा संचार असलेल्या क्षेत्रात या घटना अवघ्या महिनाभरात घडून आल्यामुळे वन्यजीवांच्या विशेषत: वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेंच कॉरिडॉरजवळ चिंचोली-पवनारादरम्यान मुदतबाह्य औषधांचा साठा मोठय़ा प्रमाणावर आढळून आला. यात वापरली गेलेली इंजेक्शन्स, प्रेग्नन्सी कीट, प्रतिजैविके आदींचा समावेश आहे. पाच जुलैला कोका वन्यजीव अभयारण्यात सापडलेल्या औषध साठय़ापेक्षाही हा साठा तिपटीने अधिक आहे. पेंच कॉरिडॉरपेक्षाही हे क्षेत्र अधिक संवेदनशील होते. वाघ आणि इतरही वन्यजीवांचा मोठय़ा प्रमाणावर या ठिकाणी वावर आहे. औषध साठा सापडण्याच्या चार-पाच दिवसांपासून वाघाचा या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संचार होता. मात्र, या अभयारण्यातून जाणारा मोठा रस्ता व आजूबाजूला असणारी गावे याचा फायदा घेऊन ही मुदतबाह्य औषधे या ठिकाणी टाकण्यात आली. असाच प्रकार अवघ्या महिनाभरातच पेंच कॉरिडॉरजवळही घडून आल्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वास्तवापासून अनभिज्ञ होते. त्यांना काही स्वयंसेवींनीच ही बातमी पुरवली. मुळातच हा प्रकार वन्यजीवांच्या जीवावर बेतणारा आहे. ही औषधे वाघांच्या तरी नाही तरी इतर तृणभक्षी प्राण्यांच्या पोटात गेली आणि ते प्राणी वाघांचे सावज बनले तर काय, या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांजवळसुद्धा नाही.
या घटनेसंदर्भात भंडाराचे मुख्य वनसंरक्षक ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या घटनेविषयी काहीही माहिती नव्हते. अशी काही घटना असल्यास चौकशी करून आपणास सांगण्यात येईल, असे उत्तर त्यांनी दिले.
कोका वन्यजीव अभयारण्यातूनच मोठा रस्ता जातो आणि पेंच कॉरिडारलगतही रस्ता आहे. नेमका याचाच फायदा उठवत रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांचा कचरा जंगलात आणून टाकला. रुग्णालयातील या मुदतबाह्य आणि वापरलेल्या औषधांच्या साठय़ावर यापूर्वीही अनेकदा वादळ उठले आहे. आता तर त्यांनी रस्त्यालगतच्या जंगलांचाच आधार घेणे सुरू केले आहे. कोकाच्या घटनेनंतर जंगलातील गस्तीवर गांभीर्याने विचार केला जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, अवघ्या महिनाभरातील या घटनेने ही अपेक्षा फोल ठरली आहे. आज अशा प्रकारच्या जंगलांमध्ये केवळ मुदतबाह्य आणि वापरलेलीच औषधे टाकण्यात आली. उद्या इतरही कामांसाठी रस्त्यालगतच्या जंगलांचा वापर होऊ शकेल. त्यामुळे या दोन्ही घटना बघता वनविभागाला सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा, रस्त्यालगतची जंगले म्हणजे गैरकृत्यांचा अड्डा बनण्यास वेळ लागणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा