गोवा राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यास भगदाड पडल्याने कालवा फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाणी उन्हाळी पीक शेतात जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा कालवा दुरुस्ती होऊन पूर्ववत होण्यास सुमारे दीड महिना वाट पाहावी लागणार असल्याचे कालवा विभागाने म्हटले आहे. या भ्रष्टाचारी कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य जलविद्युत प्रकल्प साकारला आहे. गोवा राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या डाव्या कालव्यास भगदाड पडून तो खानयाळे या ठिकाणी फुटला. याच ठिकाणी नोकरीसाठी प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन छेडले होते. त्या वेळी कालवा भ्रष्टाचार कामाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. गोवा राज्याला यापूर्वी प्रकल्प दुरुस्ती व आंदोलनाचा मोठा फटका बसला होता. आता कालवाच फुटल्याने गोवा राज्याला आणखी दीड महिना पाणी मिळणे दुरापास्त होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी वरिष्ठ या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील, तसेच कालवा पूर्ववत सुरू होण्यास दीड महिना लागेल असे सांगितले.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामांची चौकशी करावी म्हणून वेळोवेळी मागणी होत आहे. या कालव्यास भगदाड पडल्याने उन्हाळी कृषी उत्पन्न घेणाऱ्या हजारो हेक्टर क्षेत्रात माती, पाणी घुसून नुकसानी झाली, त्याचा पंचनामा केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.
गोवा राज्याला पाणीपुरवठा केल्यावर त्याचा गोवा राज्यातील तीन ते चार तालुक्यांना फायदा होतो. त्यामुळे कृषी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत होता, पण यापूर्वी आणि आता पाणीप्रश्न निर्माण झाल्याने गोवा राज्याची नेमकी भूमिका अजूनही उघड झाली नाही.
तिलारी प्रकल्पाच्या कालव्याची कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली, तसेच काही भागांत पुन्हा कामे करण्यास भर देण्यात आला, तसेच या कालवा कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात होते, तसेच त्याच्या चौकशीची मागणीही केली जात असताना कालवा फुटल्याने भ्रष्टाचाराचे जाहीर प्रकरण खुले झाले.