अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत आणि मदतही जाहीर केली जात नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणंघेणं नाही. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील उभे पीक वाया गेले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई दिली पाहिजे, पण पंचनामे करण्यास कर्मचारीच नाहीत. सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार टाईमपास करत आहे. पंचनामे करण्यास उशीर होत असेल तर सरकारने तातडीने रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, असंही नाना पटोले म्हणालेत.
महाविकास आघाडी सरकार असताना नैसर्गिक संकट आले असता तातडीने १० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली होती, नंतर पंचनामे करून मोठे पॅकेजही दिले.पण शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नाही. शेतकरी आत्महत्या दररोज होत आहेत असे विर्ढावलेले विधान या सरकारचे मंत्री करत आहेत. शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती असावी लागते ती या सरकारकडे नाही. दोन दिवसावर गुढी पाडव्याचा सण आहे, हा सण कसा साजरा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा