प्रभावी गुप्तचर यंत्रणेच्या बळावर स्थानिक पोलीस नक्षलवाद्यांनी छेडलेल्या गनिमी युद्धावर मात करू शकतात हे गुरुवारी भामरागडच्या चकमकीने सिद्ध केले आहे. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल एक डझन नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात यश मिळविले आहे. राज्याच्या टोकाला आणि छत्तीसगडला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा नेहमी वावर असतो. दर वर्षी उन्हाळय़ात नक्षलवादी या भागात अनेक बैठकांचे आयोजन करत असतात. छत्तीसगड व महाराष्ट्रात कार्यरत असलेले सुमारे २५० नक्षलवादी सीमावर्ती भागात बैठकीसाठी एकत्र आले आहेत, अशी माहिती गडचिरोली पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यानंतर लगेच शोध मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भामरागडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या व इंद्रावती नदीच्या तीरावरील भटपर गावाजवळ आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत नक्षलवाद्यांची दहा क्रमांकाची कंपनी सहभागी झाली होती. बैठकीसाठी छत्तीसगडमधून इंद्रावती नॅशनल पार्क बॉर्डर कंपनीचे सदस्यसुद्धा आलेले होते. या कंपनीकडे नक्षलवाद्यांचा मुख्य तळ असलेल्या अबुजमाड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. शिवाय याच कंपनीकडून दर वर्षी चळवळीतील सदस्यांच्या बदलीचे प्रस्तावसुद्धा हाताळले जातात. यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रचलेला सापळा कमालीचा यशस्वी ठरला.
नक्षलवाद्यांनी इंद्रावती नदीच्या पात्रातून गडचिरोली पोलीस दलातील सी-६०च्या पथकाच्या दिशेने गोळीबार केला. पण, सखल भागात असल्याने त्यांना यश मिळू शकले नाही. भामरागडपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोढराजच्या पूर्वेकडे पोलिसांचे एकही ठाणे नाही. त्यामुळे या भागात नक्षलवाद्यांचा वावर मुक्त असतो. या बैठकीसाठी जमलेले नक्षलवादीसुध्दा पोलीस येणार नाहीत याच भ्रमात होते. मात्र सी-६०च्या केवळ ८५ जवानांनी गुरुवारी कामगिरी यशस्वी करून दाखवली. गेल्या तीन महिन्यांत गडचिरोली पोलिसांना एक डझन नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे. प्रत्येक चकमकीनंतर नक्षलवादी ठार झाले, असा दावा पोलीस करतात व मृतदेह पळवून नेणारे नक्षलवादी तो फेटाळून लावतात. तीन महिन्यांत मात्र पोलिसांनी मृतदेहाचा ताबा मिळवून नक्षलवाद्यांवर मात केली आहे. गेल्या २० जानेवारीला दक्षिण गडचिरोलीत येणाऱ्या अहेरी तालुक्यातील गोविंदगावजवळ पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. यात सहा नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी चकमक आहे.
दक्षिण गडचिरोलीची खबर
उत्तरच्या तुलनेत दक्षिण गडचिरोलीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांच्या हालचालींच्या बाबतीत गेल्या काही वर्षांत पोलिसांना फारशी माहिती मिळत नव्हती. गेल्या दोन वर्षांत मात्र पोलिसांनी या भागात खबऱ्यांचे चांगले जाळे विणले. त्याचा फायदा पोलिसांना या दोन मोठय़ा घटनांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चकमकीत सातपेक्षा जास्त नक्षलवादी ठार आणि किमान १५ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा पोलीस अधीक्षक सुवेझ हक व पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी केला आहे.
आणीबाणीच्या काळात दुर्गम भागातील घटनास्थळावर पोहचण्यासाठी गडचिरोली पोलिसांच्या दिमतीला एक हेलिकॉप्टर देण्यात आले आहे. आज या हेलिकॉप्टरचा पायलटच हजर नसल्याने घटनास्थळी पोहचण्यासाठी आतुर असलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पायलटला सांभाळण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागतात, अशी खोचक प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.