सुमेध वडावाला(रिसबूड)

राजकारण आणि राजकारणाने वापरलेलं धर्मकारण या दोहोंमुळे दूषित, धर्माधित होणारं समाजभान यांचा क्षुल्लकशा पात्रांकडून चटकदार आणि चटकेदार वेध म्हणजे ‘तिसरा डुळा’तल्या सात कथा. महानगरातील हिणकस जिण्याचा कुबट दर्प त्यात शब्दबद्ध  झाला आहे. गरिबी, अतिगरिबी, अभावग्रस्तता, शोषणग्रस्तता ही एकसमान सत्यं असणाऱ्या या कथांत अचंबित करणारं जग सू्क्ष्मदर्शी नजरेतून उभं राहिलं आहे. जे भवतालाविषयीच्या आपल्या आकलनात भर घालतं.

Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Indian scientist Mahesh Galgalikar
भारतीय शास्त्रज्ञाचे अमेरिकन संरक्षण विभागाला अनोखे आरोग्य कवच!
Two drown in Pawana Dam after boat capsizes Pune print news
बोट उलटल्याने दोघांचा पवना धरणात बुडून मृत्यू; मृतदेह शोधण्यात यश
about symptoms treatment vaccine for Bleeding eye disease
जगावर नव्या विषाणूजन्य आजाराचे संकट? डोळ्यातून रक्तस्राव होणाऱ्या नव्या आजारामुळे भीती का निर्माण झाली?

मुंबई शहराच्या आतील उपनगरांच्या विस्तारलेल्या प्रदेशात जगण्याचं विविधरंगी रसायन विखुरलेलं आहे. मुंबईला इतक्या जवळ असूनही शहरी खुशालपणाच्या सीमेपलीकडलं. निम्न मध्यमवर्गाच्याही खिजगणतीत नसलेलं- हिणकस आणि भणंग. कुण्याएका काळापासून या शहरावरच्या साहित्यामध्ये चाळींमधले तोकडे आणि फाटके आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या गोष्टी रचण्यात कथाकारांना स्वारस्याधिक्य होते. पण शहरातून चाळ आणि चाळसंस्कृतीच हद्दपार झाल्या आणि या जगण्याच्या कथांचे दर्शन लोपत गेले. तरीही नव्वदोत्तरीत मध्यमवर्ग- निम्नमध्यमवर्ग आणि त्या पलीकडे असलेल्या भीषण जगण्याला अपरिहार्यतेतून कवटाळून बसलेला तळागाळातला वर्ग शिल्लक असल्याने त्याच्या विखुरण्याच्या कथा येणे आवश्यक बनले. किरण येले कवी म्हणून आधी मान्यता पावले. त्यानंतर ‘मोराची बायको’ या पुस्तकातून नात्याच्या बदलत्या मितींची त्यांनी सात कथांमधून चिकित्सा केली. त्यानंरच्या ‘तिसरा डुळा’ कथासंग्रहामध्ये त्यांनी उपनगरांत खिजगणतीत नसलेल्या व्यक्तींच्या वैशिष्टय़पूर्ण जीवनकथांचे तुकडे सादर केले आहेत.

येले यांच्या या संग्रहातील सात कथांत भिन्न प्रकारची अनेक मुख्यपात्रं आणि सहपात्रं आहेत. देवळांत, मशिदींत, शाळांत देवाधर्मासंबंधित वा थोर विभूतींच्या ज्या तसबिरी लावल्या जातात, त्या बनवणाऱ्या; बकालवस्तीतल्या ‘हारुन फ्रेम वर्क्‍स’चा गरीब मालक हारुनचाचा; रात्रीच्या मिरवणुकांत डोईवरून लखलखीत झुंबर वाहणारे गरीब मजूर; जन्माने मुसलमान पण आचरणाने हनुमानभक्त असणारा गरीब वस्तीतला, मुळातला धर्मद्वेषमुक्त तरुण; टाइपरायटर निरुपयोगी झाल्याने, त्याच्या रिबन्स बनवणाऱ्या बंद पडलेल्या कारखान्यातला बेकार मजूर; कामधंदा आटोपल्यानंतर ज्यांचा मध्यरात्रीनंतरचा प्रवास प्रामुख्याने रेल्वेच्या मालडब्यातूनच होत असतो, असे वेश्यांकडे जाऊ इच्छिणारे, जवळपास बेघर आणि लग्नेच्छू तरुण. रमझान महिन्यात वा एरवीही मशिदीबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांची वाढती फौज आणि जत्रेत रस्त्यावर शंकराची चित्रं काढून वा शंकराचं सोंग काढून पोट भरणाऱ्या भटक्या डोंबारी कुटुंबातली तीन माणसं अशी ती मुख्यपात्रं आहेत. या सर्व कथांत, पात्रांत; गरिबी, अतिगरिबी, अभावग्रस्तता, शोषणग्रस्तता ही एकसमान सत्यं आहेत.  राजकारण आणि राजकारणाने वापरलेलं धर्मकारण; या दोहोंमुळे दूषित, धर्माधित, होणारं समाजभान यांचा क्षुल्लकशा पात्रांकडून नाटय़पूर्ण, पीळदार, चटकदार आणि चटकेदार वेध म्हणजे ‘तिसरा डुळा’तल्या कथांची – कथानकांची उदाहरणं प्रातिनिधिकपणे देता येतील. लग्नवरातींसारख्या रात्रीच्या दिखाऊ मिरवणुकांत शोभा आणणारं लखलखतं झुंबरओझं डोईवर वाहणाऱ्या हमालकाम करणाऱ्या मजुरांचे, झुंबरांखालचे कष्टग्रस्त चेहरे ना मिरवणुकीतल्यांना दिसतात ना ती पाहणाऱ्यांना! ‘झुंबर’ कथेत अशा कित्येत मोलकरी झुंबरधारींपैकी कुणी एक धनकू आहे आणि असे हवे तेवढे धनकू पुरवणारा नरश्या हा दलाल आहे. साई मंदिरापुढच्या भुकेकंगाल भिकाऱ्यांपैकीच्या योग्य भिकाऱ्यांना झुंबरवाहक म्हणून संधी देण्याची कल्पकता दाखवणारा नरश्याही एकेकाळी भिकारीच होता. दगडखाणीचा मालक म्हणून सुरुवात करून बरकतीच्या पायऱ्या चढलेल्या दगडूशेटनी ते साई मंदिर बांधलं होतं आणि दयनीय भिकाऱ्यांची सोय लागली होती. ‘झुंबर’मधली मिरवणूक ही दगडूशेटच्या मुलाच्या लग्नवरातीची आहे. कधीच पाहायला न मिळालेला दगडूशेट या वरातीत तरी आपल्याला पाहता यावा अशी फुटकळशी इच्छा मनात तीव्रपणे बाळगणाऱ्या आणि झुंबरओझं पेलून थकलेल्या धनकूचा इच्छाभंग होतो. त्याची चूक नसूनही झुंबर कोसळल्याने दगडूशेटच्या माणसांकडून लाथाबुक्क्यांचा जीवघेणा मार खावा लागतो. कथा संपते ती बुभुक्षित, असहाय जीवाचा िबदू पकडून. मात्र,  क्षणभंगुरसा आत्मसन्मान संपवूनच. डोईखांद्यावरून झुंबरतेज औटघटका वाहिलं जात असल्याने मिळणारं मानमहत्त्व हे मिरवणुकीपुरतं म्हणजे क्षणभंगुरसं असतंच. झुंबर कोसळल्या क्षणानंतरचं आणि मिरवणुकीत सामील होण्यापूर्वीचं धनकूचं जिणं कसं अंतहीन तिमिरसागराचं होतं याची जाणीव; धनकूला वगळून पुढे जाणारी लखलखती ‘मिरवणूक’ वाचकाच्या मनात चमकवत – तडफडवत ठेवते.

जगल्या आणि मंगळी या डोंबाऱ्यांचा आठ-नऊ वर्षांचा मुलगा म्हादू याला ‘महादेवरूप’ होण्याचं खूळ लागलं होतं. ही घटना २३ वर्षांपूर्वीची! जत्रांत दोरीवरचे खेळ करून आणि रस्त्यावर शंकराची चित्रं काढून होणाऱ्या चिल्लर कमाईआधारे तिघांचं पोट जाळणारा जगल्या, म्हादूला महादेवाच्या नाना गोष्टींचं ‘संचित’ देऊन अकाली निधन पावतो. म्हादूला जटाधारी महादेवाचं रंगरूप देऊन त्यालाच जत्रेत नाचवण्याचा – कमाईचा नवा मार्ग मंगळीला सुचतो. महादेव हा सद्वर्तनी, सर्वशक्तिमान देवराज आहे, हे ‘संचिता’तून मनावर बिंबलेला म्हादू, रंगरूप घेतल्यावर, स्वत:ला महादेवच समजू लागतो. एरवीची अस्वच्छता वर्ज्य ठरवून स्वच्छ व्हावं वा घाणीत बसू नये वा ‘अभक्ष्य’ खाऊ नये अशा प्रकारच्या सौम्य धोरणांपुरती ही समज मर्यादित नाही. तर विशिष्ट कापड गुंडाळून घेतल्यावर डोक्यावर जटाभार बांधून मंगळीने आपल्या कपाळावर ‘तिसरा डुळा’ रंगवला की आपण ‘तांडव’ करण्याचे अधिकारी होतो, आपल्यात अमर्याद शक्ती येते, ‘तिसरा डुळा’ उघडून अनिष्ट, बुऱ्या माणसांचा आपण नाश करू शकतो असा विश्वासही त्याला वाटत राहतो.  महाशिवरात्रीच्या जत्रेत, गर्दीने बरबटलेल्या खासदाराने शिविपडीवर वाहिलेला सोन्याचा टाक चोरीला जातो आणि पोलीस खातं युद्धपातळीवर कामाला लागतं. खासदाराला सांगण्यापुरता तरी ‘संशयित आरोपी’ उभा करण्याच्या दबावामुळे ते मंगळीला आणि म्हादूला ताब्यात घेतात. त्यानंतर पोलीस स्टेशनात जे (अराजक) घडतं ते ‘तिसरा डुळा’ ही कथा सांगत नाही. ‘ते मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण आजवर अनेकदा ते तुम्ही बातम्यांत वाचलेलं – ऐकलेलं आहे’ असं कथेतला निवेदक वाचकांना थेटपणे सांगतो.. (या चोरीघटने)नंतर २३ वर्ष जातात. त्याबद्दलही निवेदक काही सांगत नाही. बहुधा, भटक्याविमुक्तांच्या ऐकीव, पण सत्य अशा दारुण जिण्या – मरण्याच्या अभेद्य चाकोरीचा दीर्घकाळ असावा. पण त्यानतंर.. आता म्हादू ३१ वर्षांचा झाला आहे. तो आता ‘महादेवाचं सोंग’ राहिलेला नाही. तो जत्रेतला पाकीटमार झाला आहे. जत्रेतल्या विक्रेत्याकडून हप्ते घेऊन पोलीस आणि भाईंना पोचवणारा एजन्ट झाला आहे. गुंडांना जत्रेतल्या पोरी – बाया पुरवण्याचाही त्याचा धंदा झाला आहे. महानगरांतल्या तीन फ्लॅट्सचा तो मालक आहे. सामाजिक  सुरक्षा, नीतिमत्ता राखण्यासाठी कार्यरत असणं अपेक्षित असणारी व्यवस्था जेव्हा तिचा अदृश्यसा ‘तिसरा डोळा’ उघडते तेव्हा संवेदनशील, निष्पाप बालमन कसं खाक होतं, निरूपद्रवी, कंगाल मुलाचा अतिउपद्रवी, अमीर होतो म्हणजेच अनिष्टसा ‘तिसरा’ डोळा’ उघडल्याने समाजविघातक शक्तिवाहकाचा कसा जन्म होतो, याचं भेदक चित्रण ‘तिसरा डोळा’ करतं ते आरंभापासून भटक्यांच्या जिण्यातल्या संकटांचा करुणसा लहेजा कायम ठेवीत!

वण्र्यविषयाचं परिपूर्ण, यथार्थ चित्रण सढळपणे, थेटपणे करणं, सूचकतेचा फुका आडोसा न घेणं ही सातही कथांची बलस्थानं आहेत. सर्व कथांना महानगरीची पार्श्वभूमी आहे. पिचलेली – शोषित माणसं हा त्यांचा केंद्रप्रदेश असला तरी कुटिल राजकारणी, नीतिहीन व्यावसायिक – धनदांडगे आणि या दोहोंना सामील असणारी ‘व्यवस्था’ या तीन शोषकांच्या कारवायांच्या प्रभावी तपशिलांमुळे त्या कथांना परिपूर्णता लाभली आहे. हे तपशीलही; केवळ ‘यथार्थता’ देण्यासाठी आणि वाचकाला चित्रण अस्सल वाटण्यासाठी, एवढय़ाच माफक उद्देशाने येत नाहीत. ‘अस्सलपणा’ हे चांगल्या कथेचे वैशिष्टय़ मानलं जातं. पण सामान्यत: माहीत नसणाऱ्या, तर्कसंगतशा तथ्यांचा कल्पकतेने केला गेलेला वापर हे गुणात्मकतेत भर टाकणारं वैशिष्टय़ ठरतं. स्पष्टीकरणार्थ ‘झुंबर’मधल्या साई मंदिराचं उदाहरण घेता येईल.. शहरात मशीद बांधली गेली तेव्हा धनकू आणि इतर भिकाऱ्यांना ‘शुक्रवार’च्या भिकेच्या आशेने आनंद होतो. पण प्रत्यक्षात शुक्रवारी, तिथले भिकारी, ‘ये हमारा अल्ला है. तुम तुम्हारे भगवान के पास जाव’ असं म्हणत धनकू आणि इतरांना हुसकून लावतात. साईबाबांचं मंदिर बांधलं गेल्यानंतर गुरुवारी हिंदू आणि मुस्लीम भिकाऱ्यांत भांडणं लागतात. दोन्ही भिकारी साईबाबांवर (धार्मिक) दावा करू लागतात. भांडणं तीव्र होतात. पोलीस येतात. त्यांच्यापुढे दोन्ही बाजू मांडल्या जातात. अखेरीला, साई मंदिर दगडूशेटनी बांधलेलं आहे, ही स्थिती निर्णायक ठरते. म्हातारा हिंदू भिकारी मुसलमान भिकाऱ्यांना म्हणतो, ‘‘दगडूशेट हमारा है. इसलिए ये साईबाबा हमारा है. जब तुम्हारा आदमी साईबाबा का मंदिर बांधेगा तो वो साईबाबा तुम्हारा होएगा’’

चकित करणाऱ्या या मंदिरविवादतथ्याचा, किरण येले कल्पकतेने उपयोग करून घेतात. म्हणजे, भिकाऱ्यांनी बचावार्थ घेतलेल्या धर्मसहाऱ्यापुरतं न थांबता कथेचं गुणवत्ता पुष्टीकरणही साधून घेतात. धनकू आणि त्याचे सोबती म्हणतात, ‘‘बरं झालं, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, कारण हिंदूंमध्ये खूप देव आहेत आणि त्यांचे वारही! अल्लासारखा एकच वार नाही हिंदूंत!’’

‘झुंबरवाहकांच्या शारीरिक आणि भावनिक कष्टप्रद जिण्याच्या इच्छाअपूर्तीच्या कथानकाला लेखकाने भिकाऱ्यांच्या अलक्षित, दैनंदिन भोगवटय़ाचे पीळ दिलेले आहेत.. नियोजित स्थळी वेगाने, विनासायास पोहोचवणारा प्रवास हा ‘सफल’ असतोच. पण तिथवर पोचेपर्यंतचे वाटेतले रम्य प्रदेश तो सहजी दाखवत असेल, तर तोच ‘सफल’ प्रवास सुफळ, उत्कट होऊन जातो. तिसरा डुळातल्या सर्वच पीळदार कथा कथानकाच्या नियोजित स्थळी वेगाने पोहोचताना भोवतालचे सामाजिक आणि ‘व्यवस्थे’चे देशप्रदेश साकल्याने उलगडत जातात. स्वाभाविकच कथा बहुमुखी आणि दीर्घाकारी होतात. अशा लेखनात; वाचनीयता आणि उत्कंठा वाढती ठेवणं हे एक आव्हान असतं. सादरीकरणाच्या दृष्टीने पात्रसंख्या कमीत कमी ठेवणं ही नाटकाची व्यवहार्य गरज, कथात्म लेखनाला गैर लागू ठरते. मात्र हवी तेवढी पात्रं उभी करताना प्रत्येक पात्राची अपरिहार्यता वाचकमनात प्रतीत करणं आणि विपुलशा पात्रांतले परस्परसंबंध, व्यक्तिमत्त्वभेद आणि मुख्य (किंवा उप) कथानकाशी त्यांची अकृत्रिमशी जोडणी सिद्ध करणं हे कथाविकसनातलं आव्हान असतं. ही दोन्ही आव्हानं तिसरा डुळातली प्रत्येक कथा यशस्वीपणे पेलते. निवेदन आणि पात्रांतले संवाद यांच्या समरसतेत अलंकरणांचा, दृष्टांतांचा वापर क्वचितच केला गेल्याने (मात्र आवश्यक तिथे न टाळल्याने प्रत्येक कथेला जाणवणारी झळाळी ही रंगरंगोटीची नसून अंत्यभूतच असल्याचा विश्वास वाटत राहतो. धार्मिक तेढ, दंगली त्यातून उठवले जाणारे लाभ, परधर्मीयांविषयी सामान्यांच्या मनात केली जाणारी द्वेषपेरणी ही काही कथांतली नेपथ्यभूमी, कथानकातलं नाटय़ ठळक, सबळ करते; मात्र नाटकीपणाला थारा देत नाही.. राग, लोभ, क्रौर्य, करुणा यांचा परिपोष करणाऱ्या प्रसंगांचे काही प्रदेश भोगलोलुप नकली आहेत. पण कथांचं विणकाम असली आहे. २३ वर्षांनंतरच्या म्हादूचं स्वगत अर्थपूर्ण आहे. कंगालपण प्रामाणिक बाप जगल्या अकाली मेल्याचं त्याचं दु:ख बोथट झालं असलं तरी जीवनाविषयीचं त्याचं आकलन भेदक आहे. म्हादू म्हणतो, ‘‘ह्ये जग आसंच है. यात पिव्वर सोन्याचा दागिना नै व्हत. दागिना बनवाया भेसळ करावी लागती. फूल, आत्तर, दव, पानी जास्त येळ नाय टिकत, कारन ते पिव्वर आस्तं. हितं पिव्वर गोष्टी लवकर मरत्यात, नि ढिव्वर लोक मॉप जगत्यात. जगल्या मेला सव्वीसाव्या साली आन ह्यो इनीसपेक्टर आजून जित्ता हाय, म्हातारा झाला तरी.’’

महानगरीतल्या हिणकस जिण्याचा कुबट दर्प शब्दबद्ध करणाऱ्या ‘तिसरा डुळा’तल्या सातही कथा. बहुढंगी वेदनांचा कल्लोळ वाचकमनात धगधगत ठेवतात.

सुमेध वडावाला (रिसबुड) हे १९९० नंतर मराठी कथासाहित्य पटलावर स्थिरावलेले महत्त्वाचे नाव. या दशकात सर्वाधिक कथालेखन. ‘सांजवा’, ‘चांदणफुला’ हे महत्त्वाचे कथासंग्रह. ‘ब्रह्मकमळ’, ‘तृष्णा’, ‘सफाई’ या गाजलेल्या कादंबऱ्या. दोन हजार सालानंतर चरित्र लेखनाकडे कल. मनश्री, मी, नंदा, हेडहंटर ही अकथनात्मक पुस्तके लोकप्रिय.

lokrang@expressindia.com

Story img Loader