सांगली : रामायणातील राम-भरत यांची पौराणिक कथा आजही बंधूप्रेमाचे उदाहरण समाजमनावर एक आदर्श म्हणून सांगितले जाते. राज्य मिळूनही रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन कारभार करणारा भरत. याची आठवण करगणी (ता. आटपाडी) येथील बंधू उपसरपंच झाल्यानंतर गावाबरोबरच श्रीराम मंदिराला हेलिकॉप्टरने फेरी मारुन भावाने अख्ख्या गावाला करुन दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपला भाऊ गावच्या उपसरपंच पदावर विराजमान झाला आणि आपल्या कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून उपसरपंचाच्या छोट्या भावाने गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील भावावरचे हे बंधुप्रेम चर्चेत आले आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव आहे. अंकुश हे गलाई व्यावसायिक असून ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात. त्यामुळे गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी आपले जेष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आलेली.मात्र भाऊ शेती सांभाळत सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचा आनंदोत्सव मात्र या भावाने मोठया थाटामाटात केले.यामुळे सर्वच जण अचंबित झाले होते.गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

हेही वाचा… रशियातील ‘मितीची’ कंपनी करणार लातूर येथे रेल्वे डब्यांची निर्मिती

खिलारे कुटुंबातील कोणी ना कोणी गावचा सरपंच, उपसरपंच व्हावा ही या कुटूंबाची खूप वर्षांपासून इच्छा होती. 20 वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी थोडक्यात हुकली होती. मात्र यंदा गावच्या उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाली आणि खिलारे कुटूंबाचे स्वप्न पूर्ण झाले. एक स्वप्न पूर्ण झाले म्हणून साहेबराव खिलारे यांचे छोटे बंधू अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टर मधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा लाखो रुपये खर्च करून पूर्ण केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To celebrates brothers victory in gram panchayat election youth from kargani village of sangli district did helicopter ride with his family and circled village asj