डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेवरुन देशातील विरोधी पक्षांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता याच मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सनातन संस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण तसेच नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांचा सनातन संस्थेशी संबंध जोडला जात आहे. कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला आठ महिने झाले मग आताच अचानक कशी काय कारवाई सुरु झाली ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
काम बघून मतदान होते यावरुन विश्वास उडाला
निवडणुकीदरम्यान केलेल्या विकास कामावर मतदान मिळते यावरून माझा विश्वासच उडाला आहे. कारण नाशिक शहरातील केलेल्या विकासकामाचा तेथील जनतेला विसर पडला होता, त्यामुळे त्यांनी मतदान करताना माझ्या पक्षाचा विचार केला नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासावर मतदान करणार नसाल तर सगळे भावनांसोबतच खेळणार असंही ते यावेळी म्हणाले.
एका माणसाच्या हट्टापायी देश खड्ड्यात
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला, यामध्ये जेमतेम १० हजार कोटी रूपये बाहेर आले. परंतु याउलट नवीन नोटा तयार करण्यासाठी सरकारलाच जवळपास १५ हजार कोटी खर्च करावे लागले असे सांगत एका व्यक्तीच्या हट्टापायी देश खड्ड्यात गेला अशी परखड टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
नाशिकमध्ये अडीच वर्ष माझ्याशी राजकारण खेळलं गेलं
मी जेव्हा नाशिक महानगपालिका पाहत होतो तेव्हा अडीच वर्ष पालिका आयुक्त दिले नव्हते. अडीच वर्ष आयुक्त न देताही जेवढ्या प्रकारची कामं नाशिकमध्ये घडली तेवढी दुसऱ्या कोणत्याही शहरात घडलेली तुम्हाला दिसणार नाहीत. जर नगरसेवकांना कामंच करायची नसतील तर आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शहरात काही नवीन करायचंच नसेल तर आयुक्त असले काय आणि नसले काय काय फरक पडतो. अडीच वर्ष महापालिकेला आयुक्त नसताना जर कामं होऊ शकतात तर मग दोन महिन्याचं काय घेऊन बसलात. अडीच वर्ष राजकारणच खेळलं गेलं ना माझ्याशी असं राज ठाकरे बोलले.