Kirit Somaiya Latest Marathi News : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी राज्यातील राजकारण तापलं आहे. किरीट सोमय्या यांनी अनेक महिला पदाधिकाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यानी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरूत आहेत. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्यांनी केवळ एक ट्वीट केलं होतं. काल (१८ जुलै) बंगळुरूत बैठक पार पाडल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना किरीट सोमय्याप्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, “मला या प्रकरणाबद्दल माहीत नाही. मी बाहेर होतो. आतापर्यंत काही पाहिलं नाही. जैसी करनी वैसी भरनी असतं.” इतकीच प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

दरम्यान, काल (१८ जुलै) संजय राऊत यांनी ट्वीट करून याप्रकरणावर अप्रत्यक्ष भाष्यही केलं होतं. किरीट सोमय्यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

“आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं.

किरीट सोमय्यांनी केली होती चौकशीची मागणी

किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. “एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहेl. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही, अशा आरोपांच्या व्हिडिओची सत्यता तपासावी, चौकशी करावी, ही देवेंद्र फडणवीसांना विनंती, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.

गृहमंत्र्यांकडून चौकशीची मागणी

किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उमटले. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरला. तसेच, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना एक पेन ड्राईन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. यावरून राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी सुरू करण्यात आली असल्याचंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To do as sanjay raut spoke clearly about the kirit somaiya offensive video sgk
Show comments