घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर अनेकदा कुटुंबाची जबादारी महिलांवर येते. ही जबाबदारी त्या खंबीरपणे पार पाडतात. आशा राजू कांबळे या देखील पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्यासमोर असलेली आव्हानं नक्कीच सोपी नव्हती.
आशा यांच्या पतीचं दुर्धर आजारामुळे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यांचे पती राजू हे पेंटिंग करायचे. मात्र दारूचे व्यसन लागल्याने ते पुन्हा पिढीजात बूट-चप्पल शिवायच्या व्यवसायाकडे वळले. कुटुंबाचं पोट भरण्याइतके पैसे ते कमावायचे. मात्र त्यांच्या निधनानं आशाचं कुटुंब वाऱ्यावर आलं. आपल्या तिन्ही मुलांचं पोट भरायचं तरी कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. धुणी- भांडी करून महिन्याला जेमतेम दीड हजार रुपये मिळायचे. यातून संसाराचा गाडा पुढे रेटणं शक्य नव्हतं म्हणूनच पतीचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आशा या लहान असताना त्यांचे वडील चप्पल बूट शिवण्याचे काम करायचे. त्यांच्याकडून त्या काम शिकल्या. ग्राहकांशी कसं बोलायचं याचा धडा देखील त्यांनी वडिलांकडून घेतला होता. त्यामुळे त्यांना चप्पल-बूट शिवण्याच्या व्यवसायात यश मिळण्यास फार दिवस लागले नाहीत. या व्यवसायातून आता त्या दिवसाला २०० ते ४०० रुपये कमावतात. त्यांचा छोटा मुलगा चंदन देखील त्यांना हातभार लावतो. राहण्याची खोली भाड्याने असल्याने महिन्याला साडेतीन हजार रुपये घरभाड्यासाठी खर्च होतात तर उरलेले पैसे हे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होतात असंही त्या म्हणाल्या.
‘सुरूवातीला अनेकांनी आपल्याला नावं ठेवली. पण काम केलं नाही तर पैसे मिळणार नाही हेही चांगलं ठावूक आहे. पतीच्या निधनानंतर एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती, मुलांच्या भविष्याचा प्रश्न होता. म्हणूनच लोकांकडे दुर्लक्ष करत मी हाच व्यवसाय सुरू ठेवण्याचं ठरवलं’ असं आशा म्हणाल्या, व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज आहे पण जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय आणखी मोठा करू असा निर्धार आशा यांनी व्यक्त केला आहे.