आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचा पक्ष आहे तसंच घड्याळ हे चिन्हही त्यांचंच आहे असा निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे दोन्ही अजित पवारांना देण्यात आल्यानंतर अजित पवार गटाने जल्लोष केला. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“पक्ष आणि चिन्ह आमच्या हातून जाणारच होता, यात नवं काय? अजित पवारांनी २०१९ मध्ये जे केलं त्यानंतर त्यांना पक्षात घेणं आणि त्यांना उपमुख्यमंत्री करणं ही आमची सर्वात मोठी चूक होती. घरका भेदी लंका डहाए असं म्हटलं जातं. त्याच भूमिकेत आता अजित पवार आहेत. अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले ना कधी यांची शेवटची निवडणूक असेल माहीत नाही. त्यावर मी म्हणालो की अजित पवार काकाच्या मृत्यूची वाट पाहात आहेत. त्यानंतर अजित पवार गडबडले आणि माझ्यावर त्यांनी टीका केली. मला नाटकी वगैरे म्हणाले. पण आज अजित पवारांनी शरद पवारांची राजकीय गळचेपी केली. या सगळ्यामागे एकच माणूस आहे अजित पवार. बाकीचे लोक जे काही बोलत आहेत ते फक्त कान फुंकणारे आहेत.” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
अजित पवारांना सगळं दिलं
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “रक्ताचं नातं अजित पवारांचं नातं आहे. शरद पवारांनी अजित पवार यांना सगळं दिलं. त्यांच्या बरोबर हे असं वागले. हा मॅनेज केलेला निकाल कुणामुळे लागला? २०१९ मध्ये कोण फुटलं होतं? आमदारांना गोळा कुणी केलं? ३० तारखेबाबत कोण खोटं बोललं? खोटी कागदपत्रं कुणी तयार केली? सगळं अजित पवारांनी केलं. ३ जुलैला सांगितलं शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत. मग ३० जूनची कागदपत्रं कशी तयार झाली? सगळं अजित पवारांनीच केलं.” असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह…”, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार शरद पवारांच्या मृत्यूची भाषा करत होते
शरद पवारांना ज्यांनी ६० वर्षे पाहिलं आहे. शरद पवारांना वजा करुन अजित पवार काय? त्यांच्या गटातला एक माणूस दाखवा जो शरद पवारांशिवाय मोठा झालाय, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ किती नावं घेऊ? त्यांना विचारा शरद पवारांना वगळून तुम्ही काय आहात? काल अजित पवार शरद पवारांच्या मृत्यूची भाषा करत होते. आज त्यांची राजकीय गळचेपी त्यांनी केली. मात्र शरद पवार फिनिक्स आहेत, राखेतून फिनिक्स पक्षी जसा पुन्हा जन्म घेऊन भरारी घेतो तसेच शरद पवार आहेत. आम्ही कसलीही चिंता करत नाही कारण आमच्याकडे शरद पवार आहेत. या सगळ्यांचा राजकीय मृत्यू होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. लोकशाहीची हत्या वेगळी काय आज जो निकाल आला हीच लोकशाहीची हत्या आहे.” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची गोष्ट २ जुलै २०२३ या दिवशी समोर आली होती. कारण अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान देत राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला होता. आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांच्याकडेच आहे असा निर्णय दिला आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.