गोकुळच्या लोण्याची मालकी कोणाची यासाठी उद्या गुरुवारी मतदान होणार आहे. या संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सत्तारूढ विरोधी गटाकडून पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे. मतदानामध्ये धोका उत्पन्न होऊ नये यासाठी ठरावधारक मतदारांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले असून त्यांना उद्या थेट मतदानाच्या वेळीच केंद्रामध्ये दाखल करण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही गटाकडून मतदारांना फेटे बांधले जाणार असून फेटय़ाच्या रंगावरून मतदानाचा कल काय हे स्पष्ट होणार असल्याने त्याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा) दूध उत्पादक संघाकडे पाहिले जाते. काही राज्यांच्या दूध संघापेक्षाही अधिक उलाढाल एकटय़ा गोकुळ दूध संघाची आहे. १६०० कोटी रुपये उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा कारभारही गेली काही वष्रे चच्रेत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने गोकुळच्या कारभाराचे वाभाडे विरोधी गटाचे नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी काढले होते. संघाच्या एका वर्षांच्या कारभारात १५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. गोकुळचे सर्वेसर्वा आमदार महादेवराव महाडिक यांचे टँकर, त्यांच्या  निकटच्या नातेवाइकांना मुंबई, पुणे येथे देण्यात आलेली दूध वितरणाची एजन्सी, त्यांचे टँकर अशा अनेक मुद्यांवरून वातावरण तापले होते. तर त्याला प्रतिउत्तर देताना महाडिक यांनी सतेज पाटील कुटुंबीयांनी त्यांचे शैक्षणिक, वैद्यकीय संस्था या देवस्थान व महापालिकेच्या जागेवर उभ्या केल्याचा पलटवार केला होता. या मुद्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हात चांगलेच तापले होते.
आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी आणि विरोधी राजर्षी परिवर्तन आघाडीच्या वतीने ठरावधारक मतदारांना आपल्या बाजूने गोळा करण्याची जोरदार मोहीम राबविली होती. एका मताचा दर दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत गेल्याची उघड चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. शिवाय सहलीसाठी गेलेल्या मतदारांना हव्या त्या गोष्टी पुरविल्या गेल्या आहेत. सहलीवर आपल्या बाजूचे काही सदस्य जाणीवपूर्वक पाठविले असून त्यांच्याकरवी फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू होते.
या पाश्र्वभूमीवर गोकुळ दूध संघासाठी गुरुवारी नागाळा पार्कातील सेंट झेविअर हायस्कूलमध्ये मतदान होणार आहे. ६ केंद्रामध्ये सरासरी ३५० मतदारांना मतदान करता येणार आहे. ३२६३ मतदार असून त्यांना उद्या आपल्या गटाचे फेटे बांधून मतदार केंद्रावर आणले जाणार आहे. गटाच्या फेटाच्या रंगावरूनच निकालाची झलक पाहायला मिळणार आहे. अत्यंत चुरशीची लढत असल्याने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक पोलीस निरीक्षक ३ सहायक पोलीस निरीक्षक ३० पोलीस तसेच ७० कर्मचारी या निवडणुकीसाठी तनात करण्यात आले आहेत. मतमोजणी शुक्रवारी सिंचन भवन येथे होणार आहे.

Story img Loader