राज्यात सातत्याने करोनासंदर्भातले निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. मग ती नियमित दुकाने सुरू करण्याची मागणी असो, लोकलने सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मागणी असो किंवा मग शाळा वा मंदिरं उघडण्याची मागणी असो. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा मागण्या जोर धरत असताना दुसरीकडे करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील कमी झालेली दिसून येत होती. मात्र, बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज नोंद झालेल्या ९० मृत्यूंमुळे राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा आता १ लाख ३९ हजार ३६२ इतका झाला आहे. तसेच, मृत्यूदर देखील २.१२ टक्क्यांवर गेला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात एकूण २ हजार ८७६ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत करोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या ६५ लाख ६७ हजार ७९१ इतकी झाली आहे. त्यापैकी ३३ हजार १८१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.३२ टक्क्यांवर गेला आहे. प्रशासकीय यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

Story img Loader